भंडारा : मागील वर्षभरापासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहेत. शासनाने शाळा सुरु करण्याचे निर्देश दिले असले तरी बहुतांश भागात अद्याप शाळा सुरु झाल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील लहान मुले पैसे कसे कमविण्याचा विचार करुन पहाटे लवकरच उठून गावोगावी जाऊन ब्रेड पावाची विक्री करताना दिसत आहेत. शाळा बंद असल्याने घरी रिकामं बसण्यापेक्षा काहीतरी काम धंदा करुन कुटुंबाला हातभार लावावा, या उद्देशाने हसण्या-खेळण्याच्या वयात हे विद्यार्थी कष्ट करत आहेत.
शाळेतच जायचं नाही म्हटल्यावर खेड्यातील विद्यार्थी दिवसभर घरी आहेत. मग रिकाम्या वेळेत खेळून-खेळून खेळणार किती? अशा स्थितीत भंडारा जिल्ह्यातील करडी, पांजरा (बोरी) परिसरातील काही शाळकरी मुलांनी ब्रेड विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. शाळा बंद असल्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांचे विदारक शैक्षणिक चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
विद्यार्थी हे शाळेचं भूषण… विद्यार्थी शाळेत असले की शाळा जिवंत होते. पण कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहेत. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी असलेल्या सायकलचा वापर करुन त्यांनी ब्रेड-पाव विकण्याचा धंदा सुरु केला आहे. काही शाळकरी मुले प्लास्टिक बॉक्स सायकलच्या मागे बांधून करडी येथे जातात. ब्रेकफास्ट म्हणून खाल्ला जाणारा ‘डबल रोटी टोस्ट’ नावाने प्रसिद्ध असलेला ब्रेड (पाव) भल्या सकाळी सायकलवर स्वार होऊन गावागावांत, गल्लोगल्ली विकताना दिसत आहेत.
भल्या पहाटे दोन चार मैल सायकल चालवून विद्यार्थ्यी पाव-ब्रेड विकतात. त्यातून त्यांना चार पैसे मिळत आहेत. जेणेकरुन ते आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकतील.
मानवी जीवन वर्तुळातील प्रत्येक बिंदूवर कोरोना विषाणूने दूरगामी परिमाण केला आहे. यात शिक्षण क्षेत्र तर फार झपाटून गेले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग थोडा वाढला रे वाढला की शाळा बंद, अशी अवस्था झाली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी शैक्षणिक सत्र सुरु झाले होते, परंतु पुनःश्च कोरोना आगमनाने विद्यार्थ्यांच्या शाळा बंद झाल्या आहेत. कोरोनाचे आकडे वाढले की विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढतं कारण शाळा बंद असतील तर त्यांना पुढचे काही दिवस बटर पाव विकल्याशिवाय पर्याय नाही…!
(Time to sell butter bread to Bhandara students Due to school closed)
हे ही वाचा :
निर्बंध शिथिल करण्यावर एकमत नाही; आता मुख्यमंत्रीच निर्णय घेणार: विजय वडेट्टीवार
चिमूर नगरपरिषदेचा प्रताप, उमा नदीपात्रात कचरा डम्पिंग, नदी प्रदूषित, स्थानिक दुर्गंधीने त्रस्त