वसई : पावसाळा सुरु झाल्याने पिकनिक स्पॉटवरील धबधबे आता प्रवाहित झाले आहेत. यामुळे पर्यटक आता धबधब्यांकडे वळत आहेत. मात्र समुद्राच्या पाण्याची वाढलेली पातळी पाहता आणि धबधब्यावरील दुर्घटना लक्षात घेता प्रशासनाने समुद्र किनारे आणि धबधबे आदि ठिकाणी जाण्यात पर्यटकांना सध्या मनाई केली आहे. मात्र तरुणाई प्रशासनाचे आदेश झुगारुन पिकनिकला जात आहे. पण कधी कधी ही हौस महागात पडते आणि जीवावर बेतते. अशीच एक दुर्घटना वसईत उघडकीस आली आहे. मनाई असताना प्रशासनाचे आदेश झुगारुन धबधब्यावर पिकनिकला गेले आणि जीव गमावून बसले. वसईच्या चिंचोटी धबधब्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला.
रोहन राठोड आणि रवी झा अशी आज मृत्यू झालेल्या दोघा तरुणांची नावं आहेत. 24 तासात चिंचोटी धबधब्यावर 3 जणांचा मृत्यू झाला. वसई तालुक्यातील चिंचोटी, तुंगारेश्वर धबधबे, समुद्र किनारे या ठिकाणी जाण्यास पोलिसांनी मनाई आदेश काढला आहे. मात्र तरीही रोहन राठोड आणि रवी झा हे दोघे मित्र धबधब्यावर पिकनिकला गेले होते. मात्र धबधब्यात अंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले.
तरुण बुडाल्याची माहिती मिळताच वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात अग्नीशमन दलाने यश मिळविले आहे. काल गुरुवारी सुमित यादव हा 18 वर्षांचा तरुणाचा धबधब्यावर बुडून मृत्यू झाला होता. तर शुक्रवारी या दोन जणांचा धबधब्यावर बुडून मृत्यू झाला आहे. मनाई आदेश झुगारुन हौशी पर्यटक धबधब्यावर जातात आणि आपला जीव गमावत आहेत. पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.