रायगड: उदयनराजे भोसले यांनी केवळ भावूक होऊ नये. त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा. त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली होती. राऊत यांच्या या मागणीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. मी बघेल. वेळ प्रसंगी मी तेही करेल, असं उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केलं. तसेच राज्यपालांची हाकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान होता. राज्यपालांच्या विधानाचा निषेध नोंदवण्यासाठी उदयनराजे भोसले यांनी रायगडावर आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं. यावेळी त्यांनी शिवप्रेमींशी संवाद साधून मोर्चाची हाक दिली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी मीडियाशी संवाद साधून मीडियाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्यावा. तसेच भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा, असं आवाहन केलं आहे, असं उदयनराजे यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं. मी बघेल. वेळप्रसंगी मी तेही करेल. मी भूमिकेशी ठाम आहे. मला जे करायचं ते करेल, असं उदयनराजे यांनी स्पष्ट केलं.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करून आज विकृतपणे सर्वधर्म समभावाच्या विचाराला नख लागत आहे. मी कोणत्याही पक्षाचं समर्थन करत नाही. महाराजांचा अवमान झाल्यानंतर हे राजकीय पक्ष आज प्रतिक्रियाच देत आहेत. का ठामपणे भूमिका घेत नाही?, असा संतप्त सवाल त्यांनी केला.
देशात राष्ट्रपतीपद हे सर्वोच्च आहे. तसंच राज्यात राज्यपाल हे सर्वोच्च पद आहे. त्यांनीच अवमान केला तर त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाहीये. माझा रोष कुणावर नाही. पण राज्यपालांची हकालपट्टी झाली पाहिजे. नाही झाली तर लोकांनी त्याचं उत्तर द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आता हा वाद थांबवा अशी उदयनराजे यांना हात जोडून विनंती केली होती. त्यावरही त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराजांचा अवमान होतो आणि तुम्ही म्हणता हा वाद थांबवा? यापेक्षा दुसरं दुर्देव काय? असा संतप्त आणि उद्विग्न सवाल उदयनराजे यांनी केला.
राज्यपालांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे. राज्यपालांनी वक्तव्य केलं असेल तर गप्प बसणार आहोत का? असा सवालही त्यांनी केला.