रायगड : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याने खासदार उदनराजे भोसले यांनी कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी भाजपलाही फैलावर घेतलं. कोण राज्यपाल? मला त्यांचं नाव घ्यायचं नाही. ते कधी मोठे नव्हतेच. राज्यपाल पद मोठं आहे. सन्मानाचं आहे, असं सांगतानाच प्रोटोकॉलच्या नावाखाली राज्यपालांना का पाठी घालता? असा सवाल उदयनराजे भोसले यांनी भाजपला केला.
खासदार उदयनराजे भोसले यांनी रायगडावर आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी त्यांनी शिवप्रेमींना संबोधित करताना भाजप आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राज्यात राज्यपाल आहे. या लोकांना महाराजांचा अपमान करणं अंगवळणी पडलं आहे. अशा विकृतीचं फावलं आहे. एक बोलला म्हणून दुसरा बोलतो. कोण राज्यपाल? त्यांचं नाव घ्यायचं नाही. ते कधी मोठे नव्हतेच. राज्यपाल पद हे सर्वात मोठं आहे. ते सन्मानाचं पद आहे, असं उदयनराजे भोसले म्हणाले.
कोणता प्रोटोकॉल? चुकीचं हे चुकीचं आहे. हे लोक जर समर्थन करत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असं आव्हानच त्यांनी यावेळी केलं.
केवळ शिवाजी महाराजच नाही तर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंची खिल्ली उडवावी असा अवमान राज्यपालांनी केला. आणि अपमान पाहत बसलो आहोत. महाराजांचा अवमान हा आपला अपमान वाटत नाही का? आपण काही करणार आहोत की नाही? या राजकारण्यांच्या किती दिवस तावडीत राहणार? आज हा देश विकृत लोकांच्या तावडीत गेला. हे सांगताना खंत वाटते, असं वेदना त्यांनी व्यक्त केली.
भीती वाटते. खंत वाटते. वेदना होतात. किती स्वार्थी आणि व्यक्ती केंद्रीत लोक झाले आहेत. लोकांमध्ये वितुष्ट जरी आलं तरी चालेल पण माझा स्वार्थ साधला गेला पाहिजे. मी सत्तेत आलो पाहिजे, हा विचार महाराजांनी केला नव्हता. त्यांनी रयतेचा विचार केला होता. तुमचा आमचा विचार केला होता, असं ते म्हणाले.
अनेक राज्यांचे राज्य त्या राजांच्या नावाने ओळखलं गेलं. पण शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य म्हणून ओळखलं जातं. आज तीच रयत स्वार्थ पाहताना दिसत आहे. राजकीय स्वार्थ साधत आहे. त्यामुळेच महाराजांचा अवमान करण्याचं धाडस होत आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
तुम्ही आज लोकशाहीतील राजे आहात. हे आमदार, खासदार, मंत्री फंत्री तुमच्यामुळे आहेत. त्यांच्यामुळे तुम्ही नाहीत. या लोकांना महाराजांचा अवमान होतो तेव्हा लाज वाटत नाही का? यांना अवमान करणाऱ्यांना झापता येत नाही का? असा सवालही त्यांनी केला.