चिपळूण: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आल्यापासून राज्यावर संकटाची मालिका सुरू आहे. राज्यावरील संकटं हा मुख्यमंत्र्यांचा पायगुण आहे, अशी खोचक टीका करतानाच कोरोना ही मुख्यमंत्र्यांचीच देण आहे, असा हल्लाबोल केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी चढवला. (narayan rane slams cm uddhav thackeray over corona, flood and landslide in maharashtra)
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी चिपळूणच्या बाजारपेठेत जाऊन पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच हल्ला चढवला. राज्यात संकट येत आहेत. त्याला कारण मुख्यमंत्र्यांचा पायगुण आहे. ते आल्यापासून वादळं काय, पाऊस काय, कोरोना काय… सगळं चालूच आहे. कोरोना ही त्यांची देण आहे आपल्याला. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊनच आले. पाय पाहायला पाहिजे, पांढरे पाय आहेत का, अशी खोचक राणेंनी केली.
मुख्यमंत्री आले त्यांनी पाहणी केली. ते आढावा घेतील. पण मी इथून गेल्यानंतर पंतप्रधानांना रिपोर्ट देणार आहे. कोणत्या प्रकारे नागरिकांना दिलासा दिला जाईल. त्यांना आपल्या पायावर कसं उभं करता येईल हे पाहू. ही आमची माणसं आहेत आमच्या घरातील माणसं आहे. त्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाही याची काळजी घेऊ, असं सांगतानाच चिपळूणमध्ये भयावह स्थिती आहे. व्यापाऱ्यांना विम्याचे पैसे अॅडव्हान्स मिळावेत, सरकारने नुकसान भरपाई द्यावी आणि त्यांच्या घरांचं पुनर्वसन करावं, आदी मागण्याही त्यांनी केला. केंद्राच्या विविध योजनांचा आधार घेऊन व्यापाऱ्यांना मदत करू असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आम्ही पाहायला आलो नाही. आमच्या घरातील माणसं बेघर झाली आहेत. त्यांना कशी मदत करता येईल, त्यांना कसा दिलासा देता येईल, यासाठी आम्ही आलो आहोत. आजचं पाहिल्यानंतर अत्यंत दुखं झालं वाईट वाटलं. त्यांना सर्वोतोपरी मदत केली जाईल. ते आमचं कर्तव्यच आहे, असं ते म्हणाले.
यावेळी राणे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले. मी आणि दोन्ही विरोधी पक्षनेते चिपळूणमध्ये आलो आहोत. पण प्रशासन बेजबाबदार आहे. त्यांना नियम माहीत नाही. प्रोटोकॉल माहीत नाही. आम्हाला भेटायला एकही अधिकारी आला नाही. अतिरिक्त जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी आणि इतर अधिकारी कार्यालयात बसून होते. पण विरोधी पक्षनेते आलेत, केंद्रीय मंत्री आहेत, तरीही हे अधिकारी आले नाहीत. हा बेजबाबदारपणा आहे. त्याबाबत योग्य कारवाई केली जाईल. याबाबत मी राज्याचे मुख्यसचिव आणि केंद्राकडे तक्रार करणार आहे. या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय मी तरी स्वस्थ बसणार नाही, असं सांगतानाच अशा अधिकाऱ्यांना चिपळूणमध्ये ठेवू नका. ठेवल्यावर मी तरी त्यांना खूर्चीवर बसू देणार नाही, असं राणे म्हणाले.
लोक रडत आहेत. घरातील सामान फेकून देत आहेत. अन् अधिकारी दात काढत आहेत. मुख्यमंत्र्यांना सोडवायला गेले. ते काय पाहुणे आहेत काय? येऊन पाहणं हे त्यांचं काम आहे. अधिकारीच बेजबाबदारच आहेत, असं सांगतानाच पुढच्यावेळी मी न सांगता येईल. मग बघू तुमच्या खुर्च्या राहतात का?, असा इशाराही त्यांनी दिला.
मुख्यमंत्री चौथ्या दिवशी कोकणात का आले ते सांगतो. काल साडे सहाला माझा फॅक्स आला. मी कोकणात येत असल्याचं कळवलं होतं. त्यानंतर त्यांनी पूरपरिस्थिती पाहण्याचा कार्यक्रम तयार केला. तेव्हा मातोश्रीचा दरवाजा उघडला. नाही तर बंद होता. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असतात तसे ते अॅडमिट होते. आज सकाळी त्यांना डिस्चार्ज झाला. तर ते डायरेक्ट चिपळूणमध्ये आले. काय मुख्यमंत्री? कसली संवेदना? ही परिस्थिती झाल्या झाल्या त्यांनी यायला हवं होतं. उभं राहून सर्व यंत्रणा कामाला लावायला हवी होती, असं ते म्हणाले. पाठांतर करून यायाचं आणि बोलायचं. कसला मुख्यमंत्री. या राज्यात मुख्यमंत्री नाही. प्रशासन नाही. अशी भयावह परिस्थिती आहे, अशी टीकाही त्यांनी केली. (narayan rane slams cm uddhav thackeray over corona, flood and landslide in maharashtra)
संबंधित बातम्या:
पूरग्रस्तांसाठी पॅकेजची घोषणा कधी करणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात….
(narayan rane slams cm uddhav thackeray over corona, flood and landslide in maharashtra)