धुळे : मागील अनेक दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचारी त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत कामावर रुजू होणार नाही, असा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाने व्यापक स्वरुप धारण केलेले असताना त्यामध्ये फूट पाडण्याचा कट रचला जातोय, असा आरोप केला जातोय. या पाश्वभूमीवर धुळ्यात आगारातून सोडण्यात आलेल्या 4 बसेस अज्ञातांनी फोडल्या आहेत. आज (21 नोव्हेंबर) सकाळी ही घटना घडली आहे. यामध्ये एक चालक जखमी झालाय.
गेल्या चौदा दिवसांपासून एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी धुळ्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना जाणून न घेता प्रशासनातर्फे बसेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तब्बल 14 दिवसांनंतर आज धुळे एसटी आगारातून लालपरी मार्गस्थ करण्यात आली होती. आज सकाळी पोलिसांच्या फौजफाट्यामध्ये या बसेस आगाराबाहेर पडल्या होत्या. परंतु या आपल्या मार्गावर जात असताना अज्ञातांनी या बसेसवर दगडफेक केली. त्यामध्ये एक एसटी चालक जखमी देखील झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची धग संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे. राज्यातील बहुतांश आगारात बसेस जागेवर उभ्या असून कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे ही या आंदोलकांची मुख्य मागणी आहे. मुंबईत आझाद मैदानात मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी ठाण मांडून बसलेले आहेत. तर या आंदोलनाला विरोधी पक्ष म्हणजेच भाजपने पाठिंबा दिलेला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे एसटी कर्मचाऱ्यांसोबत आंदोलनात सामील झालेले आहेत.
सरकार विलीनीकरणावर अभ्यास करणार
दरम्यान, दुसरीकडे राज्य सरकार एसटी महामडंळाच्या विलीनीकरणावर अभ्यास करण्यास तयार असल्याची माहिती अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी 20 नोव्हेंबर रोजी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच काल झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आणि राज्य सरकारमधील बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही.
इतर बातम्या :
आघाडी सरकार हे वसुली सरकार, पोलखोल करण्यासाठी जनतेत जाणार, भाजप प्रवक्ते राम कदम यांची माहिती
काँग्रेसच्या जनजागरण पदयात्रेला कल्याणमध्ये मानापमानाचं ग्रहण; सेवा दलाने टाकला बहिष्कार