सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यातील शिराळा पश्चिम भागात मागील पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर शनिवारपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम भागात रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. शनिवारपासून पावसाने (Rain) हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. पावसाने वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सायंकाळी कोकरूड रेठरे बंधारा पाण्याखाली गेला आहे. पावसाच्या संततधारेमुळे शेतकरी (Farmer) राजा सुखावला आहे. जिल्हातील जवळपास सर्व धरणे आता फुल्ल होतील. पाणलोट क्षेत्रात देखील मोठी वाढ झालीयं.
आज वारणा धरणामध्ये 28.78 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी चालू असून धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. धरणातील पाणी पातळी निश्चित ठेवण्याकरिता धरणातून केव्हाही नदीपात्रात दोन हजार ते चार हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. तरी नदीकाठच्या गावांना व ग्रामस्थांना दक्षतेचे आदेश देण्यात आला आहे. तर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिलायं. कारण नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊ शकते.
काल चांदोली धरणातून 3000 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग होता. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून दिला गेलायं. शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने सायंकाळी चार वाजता चांदोली धरणाचे चार वक्राकार दरवाजे 0.25 मीटरने उचलून पाणी सांडव्यातून 1300 तर विद्युत निर्मितीतून 1700 असे एकूण 3000 कुसेक्स्ने वारणा नदीत पाणी सोडले जात आहे.