सोलापूर : औरंगजेबाचा फोटो नाचवणे, आक्षेपार्ह स्टेट्स ठेवणे यावरून राज्यातील काही भागात तणावाची स्थिती असतानाच सोलापुरात आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. लव्ह जिहादच्या संशयावरून 15 जणांच्या टोळक्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे. मात्र, केवळ संशयावरून एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे.
सोलापुरात लव्ह जिहादच्या संशयावरून एका युवकाला 15 जणांच्या टोळक्याने मारहाण केली आहे. आमच्या धर्माच्या मुलीला फसवतो का? असे म्हणत ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप पीडित युवकाने आपल्या फिर्यादित केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अन्य आरोपीचा शोध घेतला जात आहे. या सर्व आरोपीं विरोधात भादंवि कलम 363, 324, 341, 143, 147, 149, 504 आणि 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात फिर्यादी असलेला तरुण सोलापूर शहरातील एका महाविद्यालयात एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेत आहे. त्याच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या दोन मुली या अनेक दिवसांनी त्याला भेटल्या. त्यामुळे हे सर्व जण महाविद्यालयाच्या जवळ असलेल्या एका कॉफीशॉपमध्ये गप्पा मारत बसले होते. काही वेळाने तरुणांची एक टोळी त्यांच्या जवळ आली आणि तू आमच्या धर्मातील मुलींसोबत का बोलतो? असा जाब फिर्यादी तरुणाला विचारू लागले. त्यामुळे या टोळक्यांशी तरुणाची शाब्दिक चकमक उडाली.
त्यानंतर या टोळक्यातील तरुणांनी फिर्यादी तरुणास एमआयडीसी परिसरात नेलं आणि त्या ठिकाणी पुन्हा त्याला जाब विचारत मारहाण केली. या टोळक्यांनी बेदम मारहाण केल्याने हा तरुण जखमी झाला. त्यामुळे तो जमिनीवर कोसळला. त्यामुळे आजूबाजूला असलेल्या लोकांनी या तरुणाला तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर संबंधित तरुणाच्या फिर्यादीवरून सोलापूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलिसांनी ताबडतोब तपास करत एका आरोपीला अटक केली. इतर आरोपीची देखील ओळख पटली असून कायदेशीर कारवाई सुरु असल्याची माहिती सोलापूर पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली. दरम्यान, सोशल मीडियावर सोलापूर सायबर पोलीस नजर ठेवून आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे कोणी षडयंत्र करत असेल तर सोलापूर पोलीस त्यावर कठोर कारवाई करेल, अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली.