मुंबई : कांद्याच्या प्रश्नावरुन आज राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. त्यावेळी केंद्र सरकारने 2 लाख मेट्रीक टन कांदा 2410 रुपये प्रतिक्विंटल दराने विकत घेण्याचा निर्णय़ घेतला. धनंजय मुंडे यांची वाणिज्य मंत्र्यांबरोबर बैठक सुरु होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी टि्वट करुन कांद्याच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्र्यांबरोबर चर्चा केल्याची माहिती दिली. त्यावरुन महायुती सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याची चर्चा रंगली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली.
त्यावेळी कांद्यावरुन श्रेयवादाची लढाई सुरु आहे का? असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले की, “ही श्रेयवादाची लढाई नाही. शेतकऱ्याला मदत करण्याची आमची भूमिका आहे”. आमचे निर्णय सामूहिक असतात, असे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री म्हणाले.
‘मग शरद पवारांच्यावेळी असा निर्णय का नाही झाला?’
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कांद्याला 4 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याची मागणी केली आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “शरद पवार मोठे नेते आहेत. आता या विषयावर राजकारण न करता शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री होते. त्यावेळी सुद्धा अशी परिस्थिती निर्माण झालेली. पण त्यावेळी असा निर्णय का नाही झाला?. शेतकऱ्यांवर संकट आलं, तेव्हा पंतप्रधान, केंद्र सरकार पाठिशी उभे राहिले”
साखर उद्योग अडचणीत आला, तेव्हा आम्ही केंद्राकडे गेलो. काही हजार कोटींची इन्कम टॅक्समध्ये सवलत दिली, असं मुख्यमंत्री म्हणाले. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं शिंदे म्हणाले. नाफेडने 2 लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये प्रतिक्विंटल दराने विकत घेण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी शिंदे यांनी पंतप्रधान मोदी आणि शिंदे यांचे आभार मानले.