भाजप नेत्या आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी भक्तीभगवान गडावर शनिवारी दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यास राज्यभरातून गोपीनाथ मुंडे यांचे चाहते आले होते. या मेळाव्यात त्या चाहत्यांना पंकजा मुंडे यांनी प्रथमच एका युवकाची ओळख करुन दिली. त्या युवकाला व्यासपीठावर बोलवले अन् त्याला जवळ घेत पंकजा म्हणाल्या, हा गोरा गोरा मुलगा कोण आहे. हा माझ्यापेक्षा फार उंच. फार गोड आहे. हा माझा मुलगा आर्यमन. तो भगवान बाबाच्या दर्शनाला आला. तुम्हाला वाटत असेल मला आर्यमन जास्त प्रिय आहे. पण मी त्याला सांगितले, तुझ्या पेक्षा माझी जनता मला प्रिय आहे. जेव्हा माझ्यावर जीएसटीचा छापा पडला. तेव्हा १२ कोटी रुपये या जनतेने भरले. या लोकांनी मला जीव लावला. तुम्ही सर्वांनी माझ्यावर मुलीसारखं प्रेम केले. आता मला काही नाही पाहिजे, असे भावनिक भाषण पंकजा मुंडे यांनी केले.
माझे बंधू महादेव जानकर. पिवळे शर्टवाले. किती पिवळे शर्ट आहे तुमच्याकडे? गोंडस लेकरू लक्ष्मण हाके. गोंडस आहे की नाही. काल त्यांनी व्हिडिओ पाठवला. दसरा मेळाव्याला येतो म्हणाला. माझ्या दसऱ्याला मी कुणालाही निमंत्रण देत नाही. पण माझा सन्मान ठेवून हाके आले.
मेळाव्याला १८ पगड जातीचे लोक आले की नाही,. नाशिकहून आले का, नगरहून आले का, बुलढाण्याहून आले का, आता कुठून कुठून आले गंगाखेड, जिंतूर परभणी नांदेड, अकोला अमरावती पुणे पिंपरी चिंचवड आले का …. सगळ्या राज्यभरातून आलेले बांधव. तुम्हाला मी दरवर्षा साष्टांग दंडवत घालते. कारण माझ्या बापाने मरताना माझ्या झोळीत तुमची जबाबदारी टाकली आहे. तुम्ही मला जिंकवलं मला इज्जत दिली. माझा पराभव झाल्यावर सर्वात अधिक इज्जत दिली. आता मी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात दौऱ्याला येणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा की नाही.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे प्रथमच दसऱ्या मेळाव्यात एकत्र आले. पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी तडाखेबाज भाषण करत पंकजा मुंडे यांच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता, त्यांनी टोला लगावला. महाराष्ट्रातील सर्व संत, महात्मे आणि थोर पुरुषांनी कधी जातीचे राजकरण केले नाही. ते म्हणाले, छत्रपतींची शिवाजी महाराजांनी राज्य उभे केले, ते एका जातीसाठी नव्हते. ते अठरा पगड जातींसाठी म्हणजेच सर्वांसाठी होते.