लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे आणि याच जयंतीनिमित्त त्यांची कन्या पंकजा मुंडे यांनी नवीन संकल्प हाती घेतलाय. कष्टकरी मजुरांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आज त्या थेट ऊसाच्या फडात पंकजा पोहचल्या. दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या पावलावर पाऊल ठेवून आज पंकजा मुंडे यांनी देखील सर्वसामान्यांसोबतची नाळ जोडण्याचा प्रयत्न केला आहे. यावेली पंकजा मुंडेंनी ऊसाची मोळी उचलली, वीट भट्टीवर कामही केले आणि केळीच्या पानावर जेवणाचा आस्वादही घेतला आहे. यावेळी खासदार प्रीतम मुंडे याही बरोबर होत्या.
मजुरांचा नेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांची ओळख
ऊसतोड मजुरांचा नेता म्हणून दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची खरी ओळख होती. मुंडे यांच्या निधनानंतर ऊसतोड मजुरांचं नेतृत्व त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्याकडे आलं. सलग दोनवेळा विजय मिळवल्यानंतर पंकजा मुंडे यांना यावेळी मात्र पराभव स्वीकारावा लागला. पंकजा मुंडे यांची क्रेझ कमी झाली की काय अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात झाली. मात्र दोन वर्षात पंकजा मुंडे त्यांची मतदारसंघावरील पकड मजबूत करताना दिसून आल्या. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज पंकजा मुंडे यांनी एक अनोखा संकल्प केला. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आजच्या दिवशी वसा राखण्याचा संकल्प पंकजा यांनी हाती घेतला. पंकजा यांनी थेट ऊसाच्या फडावर जाऊन मजुरांची व्यथा जाणून घेतल्या. त्यांच्या लेकरांशी गप्पा मारल्या, त्यांच्यासोबत जेवणही केले. नेत्या पंकजा मुंडे ह्या पहिल्यांदाच पालावर पाहून मजुरांनाही आनंद झाला.
बीडमध्ये ऊसतोड मजुरांची संख्या मोठी
बीड जिल्ह्यात ऊसतोड मजुरांची संख्या सहा लाखांच्या घरात आहे. दरवर्षी जवळपास पाच लाख मजूर स्थलांतरित होतात. मजुरांच्या हातातील कोयता काढून त्यांना ऊसउत्पादक बनविण्याचे स्वप्न अनेकांनी दाखविले. मात्र मजुरांच्या स्वप्नांची पुर्ती काही झालीच नाही. आज पंकजा मुंडे पालावर गेल्या आणि मजुरांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. लोकेनते गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी राजकीय भाष्य टाळले आहे. मात्र बंधू धनंजय मुंडेंवर टीकास्त्र करण्याचं सोडलं नाही. बीडचे पालकमंत्री सध्या पोस्टर- बॅनरमध्येच दिसतात अशी मिश्किल टीका पंकजा यांनी धनंजय यांच्यावर केलीय. पंकजा मुंडेंचा रोख लक्षात घेता येणाऱ्या सर्वच निवडणुकीत बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा मुंडे भावंडं पुन्हा एकदा आमनेसामने येणार असल्याचे चित्र दिसत आहे.