औरंगाबाद: मराठा समजाला आरक्षण मिळावं ही आमची भूमिका स्पष्ट आहे. त्यासाठी आम्ही मराठा समाजाच्या मागे नाही तर पुढे राहू. पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. (pankaja munde oppose reservation for Marathas from OBC quota)
पंकजा मुंडे यांनी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारला धारेवर धरतानाच मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट केली. आजच्या परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे. या मागणीसाठी आम्ही मराठा समाजाच्या पाठी नव्हे तर समोर उभे आहोत. परंतु, जे ऑलरेडी मागास आहेत त्यांच्या आरक्षणात मराठा समाजाला आरक्षण द्यावं याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
मराठा आरक्षणाला पाठिंबा
खासदार संभाजी छत्रपती गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाचा मुद्दा मांडत आहे. त्यावर आता भाजपने बोलण्याची गरज नाही. हा प्रश्न राज्य सरकारच सोडवू शकत असल्याने त्यावर सरकारनेच बोलायचं आहे. मात्र, संभाजीराजेंना आमचा पाठिंबा असून मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर आम्ही सदैव त्यांच्याबरोबर आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संभाजी छत्रपती यांनी त्यांच्यावर सरकार पाळत ठेवत आहे, असा आरोप केला आहे. त्यावर पंकजा मुंडे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. सरकार संभाजीराजेंवर नजर ठेवतंय हे गंभीर आहे. त्यांचा आरोप गंभीरपणे घेतला पाहिजे. सरकारने असं कोणतंही काम करून संभाजीराजे यांचा अवमान करू नये, असं त्या म्हणाल्या.
मराठा समाजाला ईडब्ल्यूएसमधून आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसा जीआरही काढण्यात आला आहे. त्यावर त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर मी जीआर पाहिला नाही. त्यामुळे मी त्यावर टिप्पणी करणार नाही, असं सांगतानाच पण हा जीआर मराठा समाजाला तरी मान्य आहे का? हे महत्त्वाचं आहे, असा सवालही त्यांनी केला. (pankaja munde oppose reservation for Marathas from OBC quota)
संबंधित बातम्या:
OBC आरक्षण: सरकारची आरक्षणाची मानसिकताच नाही, आम्ही निवडणुका होऊ देणार नाही; पंकजा मुंडे कडाडल्या
‘भाजपनेच ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला, आता चोराच्या उलट्या बोंबा’, पटोलेंचा पलटवार
(pankaja munde oppose reservation for Marathas from OBC quota)