माझं लग्न झालं नाही, मला घर-दार नाही. मी रेल्वे स्टेशनवरसुद्धा झोपू शकतो. माझं कुठं कॉलेज नाय, शाळा नाय, काही भानगड नाय, कुठे, लफडं नाय. हा देह तुमच्यासाठीच आहे, अशी भावनिक साद राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी परभणीकरांना घातली. महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे भरभरून कौतूक केले. महादेव जानकर हा साधा माणूस आणि फाटका माणूस आहे. त्यांची निवडणूक जनतेची निवडणूक करा, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नागपूर, बारामतीप्रमाणे पराभणीचा विकास करणार आहे. मी खासदार झाल्यावरही तुम्हाला विचारल्याशिवाय सही करणार नाही. परभणीच्या विकासासाठी मी नेत्यांकडे माझी झोळी पसरवेल. परभणीच्या विकासाचं रोल मॉडेल मी बनवणार आहे. या ठिकाणी एअरपोर्ट आणणार आहे. परभणी समृद्धी महामार्गा जोडण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मला इंग्रजीसह १७ भाषा येतात. त्यामुळे संसदेत परभणीचा प्रश्न ठामपणे मांडता येणार आहे. मी आता परभणीत घर घेतोय, येथेच एक बंगला घेऊन राहतो, असे जानकर यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मला संदेश दिला आहे. ते म्हणाले होते, ‘जानकरांना सांगा 18 वी लोकसभेत मी त्यांची वाट पाहत आहे.’ यामुळे परभणीकर विक्रमी मतांनी त्यांना लोकसभेत पाठवणार आहे. हा महादेव जानकर फाटका आला तो फाटकाचं राहिला तो नंतरही फाटकाचं राहणार आहे. लोकसभेसाठी राजेश विटेकर आणि बबनराव लोणीकर यांनी जोरदार तयारी केली होती. परंतु जानकर यांच्यासाठी त्यांनी माघार घेतली.
समुध्दी महामार्ग परभणीत नाही, याची खंत आपणास आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. परंतु या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग आम्ही बनवायला घेतलेला आहे. शक्तीपीठ महामार्ग परभणीत जाणार आहे. या ठिकाणी इंडस्ट्रीयल कलस्टर आम्ही करणार आहोत. विकासांच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. महादेव जानकरांना मत म्हणजे मोदीजींना मत आहे. त्यांच्या पाठिशी कमळ, धनुष्यबाण, घड्याळ उभे आहे.
महादेव जानकर यांना आपणास निवडून आणायचं आहे. हा साधा माणूस आणि फाटका माणूस आहे. त्याची निवडणूक जनतेची निवडणूक करा. तुम्ही थकाल पण जानकर साहेब थकणार नाही. जानकरांच्या विजयी सभेत आपण सर्व एकत्र राहू, असे फडणवीस यांनी म्हटले.