मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यांकडून शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह (Shiv Sena Symbol) गेले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश शुक्रवारी दिला होता. निवडणूक आयोगाच्या निकालात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त केला जात आहे. ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. आयोगाच्या निकालानंतर परभणीतील शिवसैनिकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्या शिवसैनिकाला अश्रू अनावर झाले आहे.
काय आहे व्हिडिओत
बाळासाहेब घात झाला हो… असं म्हणत हा शिवसैनिक व्हिडिओत ढसाढसा रडत आहे. तो म्हणतो, शिवसेनेचा धनुष्यबाण जो परभणी जिल्ह्याने शिवसेनाला दिला होतो तो धनुष्यबाण गद्दारांनी गद्दारी करुन घेतला आहे. गद्दरांनी सामान्य शिवसैनिकांच्या काळजात घाव घातला. तुम्ही म्हणतात, रडायचे नाही, लढायाचे आहे. कसे लढायचे देवावरचा विश्वास उडून गेला.
कोण आहे तो शिवसैनिक
ज्या शिवसैनिकाचा हा व्हिडिओ आहे, त्याचे नाव विजय खिस्ते पाटील आहे. यापूर्वीही त्यांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी आपल्या रक्ताने पत्र लिहिले होते.
उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी निकाल आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे संकेत दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ‘मातोश्री’बाहेर सभा घेतली. यावेळीही त्यांनी आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्यांकडून सोमवारी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सोमवारी याचिका दाखल केली जाणार आहे. परंतु आयोगाचा निर्णय अनेक ठाकरे गटातील शिवसैनिकांना रुचला नाही. त्यांच्या भावना अनावर झाल्या आहेत.
मातोश्री बाहेर गर्दी, युवतीचा राजीनामा
मातोश्रीबाहेर गेल्या दोन दिवसांपासून असंख्य शिवसैनिकांची गर्दी सुरु आहे. शनिवारी उद्धव ठाकरे यांनी जीपवर उभे राहून भाषण केले. त्यामुळे पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या त्या भाषणाची आठवण झाली. तर, एका युवतीने थेट आपल्या मल्टीनॅशनल कंपनीतील नोकरीचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. पुर्णवेळ आपण पक्षासाठी काम करणार असल्याचे तिने म्हटले आहे. यामुळे शिवसैनिकांच्या शिवसेनेच्या प्रेमाची आठवण येत आहे. आपल्या तडाखेबंद, बिनधास्त भाषणामुळे ती चर्चेत आली आहे. तिचे नाव अयोध्या पौळ आहे. शिवसेना विरोधी असणाऱ्या मोठ्या नेत्यांना आव्हान देण्यासही ही युवती मागे पुढे पहात नाही. एका प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून तिला काळजी घेण्यास सांगितले होते.