किशोर पाटील, जळगाव दि. 14 फेब्रुवारी 2024 | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांनी बंड पुकारले होते. शरद पवार यांच्यापासून वेगळी भूमिका घेऊन ते महायुतीत सामील झाले. त्यांच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात गेला. त्यात अजित पवार यांना यश मिळाले. आता शरद पवार गट निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. ही सर्व प्रक्रिया सुरु असताना अजित पवार यांना त्यांच्या पक्षातून बंडाचा इशारा दिला आहे. हा इशारा अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासाठी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील तरुण कार्यकर्ते तसेच पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. अजित पवार यांच्याविरुद्ध बंड पुकारण्याचा इशारा तरुणांनी दिला आहे. पार्थ पवार यांना राज्यसभेवर उमेदवारी न दिल्यास हजारो युवक पक्षातून बाहेर पडतील, असा थेट इशारा देणारे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील यांनी केले आहे. अजित पवार यांच्या विरोधातील या बंडाच्या इशाऱ्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ दादा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्या अन्यथा हजारो युवक बाहेर पडतील असा थेट इशारा पक्षश्रेष्ठींना पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांनी दिला@AjitPawarSpeaks @SunilTatkare @praful_patel @parthajitpawar pic.twitter.com/PGaz6z4S23
— Ncp Ravindra Nana Patil (@NcpRavindraNana) February 14, 2024
पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी थेट रवींद्र पाटील यांनी ट्विट केले. एका प्रकारे अजित पवार यांनाच हा थेट इशारा दिला आहे. आता पार्थ पवार यांना राज्यसभेवर उमेदवारी न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील तरुण कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेतात? हे पहावे लागणार आहेत. तर दुसरीकडे आता कार्यकर्त्यांनी थेट पक्षातून बाहेर पडण्याच्या दिलेल्या इशारानंतर अजित पवार नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाने आपलआपले उमेदवार जाहीर केले आहेत. परंतु अजित पवार यांच्या गटातून अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. छगन भुजबळ यांच्याकडून ओबीसी समाजाला राज्यसभेची उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. तर नवाब मलिक यांनीही राज्यभेत जाण्याची इच्छा आहे.