महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल? याचा भरोसा नाही. राजकारणात काहीही घडू शकतं. राजकारणात शत्रू मित्र बनू शकतात आणि मित्र शत्रू बनू शकतो हे आपण गेल्या 5 वर्षाच्या घडामोडींमधून पाहिलं. त्यामुळे राजकारणात कुणीही एकमेकाचा कायम स्वरुपाचा मित्र किंवा शत्रू असू शकत नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक जागांवर यश मिळालं आहे. महाविकास आघाडी या निवडणुकीत अक्षरश: भुईसपाट झालेली बघायला मिळाली आहे. विशेष म्हणजे विरोधकांना विरोधी पक्षनेता पद देखील मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाविकास आघाडी या पराभवाची वास्तविकता स्वीकारत असतानाच अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी नव्या राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत.
पार्थ पवार यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्वीटमुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गटाच्या काही आमदारांचा प्रवेश होणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. पार्थ पवारांच्या ट्विटमुळे शरद पवारांच्या पक्षातील कोणी आमदार अजित पवार यांच्याकडे येणार असल्याचे सूचक संकेत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यांचं ट्वीट त्याच दृष्टीकोनाने असेल तर एक-दोन आमदार अजित पवार गटात गेले तर पक्षाच्या नियमानुसार त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते. पण आमदारांचा गट गेला तर त्यांना मान्यता देखील मिळू शकते. अर्थात या सगळ्या जर-तरच्या गोष्टी आहेत. शरद पवार यांच्या पक्षाला केवळ 10 जागांवर यश मिळालं आहे. अशा परिस्थितीत पार्थ पवार यांचं हे सूचक ट्विट कितपत खरं ठरतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
“महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या आमदारांना शुभेच्छा देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊ इच्छिणाऱ्या सर्व आमदारांचे मी स्वागत करतो. आपण सर्व अजितदादांच्या नेतृत्वात एकत्र येऊन महाराष्ट्राला प्रगती पथावर घेऊन जाऊ”, असं सूचक ट्विट पार्थ पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटवर आता इतरांकडून काही प्रतिक्रिया देण्यात येते का? किंवा खरंच तशा काही घडामोडी घडतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.