‘पक्षाने वाऱ्यावर सोडले, ‘ते’ गेल्यानंतर छत्र धरलं नाही’, राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता आता पक्ष सोडण्याच्या तयारीत

| Updated on: Jun 25, 2023 | 4:00 PM

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रवर आपले लक्ष केंदित केले आहे. महाराष्ट्रात एकपाठोपाठ सभा घेण्याचा त्यांनी सपाट लावला आहे. सुरेख पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून बीआरएस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आता आणखी एक नेता राष्ट्रवादी सोडून मंगळवारी बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहे.

पक्षाने वाऱ्यावर सोडले, ते गेल्यानंतर छत्र धरलं नाही, राष्ट्रवादीचा हा नेता आता पक्ष सोडण्याच्या तयारीत
BHAGIRATH BHALKE
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

सोलापूर : पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांचा मुलगा भगीरथ भालके यांनी पक्षाला सोडचिट्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना बीआरएस आणि एमआयएमला हलक्यात घेऊ नका असा इशारा दिला होता. त्यापाठोपाठ भगीरथ भालके यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत बीआरएसमध्ये जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएस पक्षाचे नेते के. चंद्रशेखर राव हे मंगळवारी 27 जूनला पंढरपुरच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी आपण बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहात अशी घोषणा भगीरथ भालके यांनी केली आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह 27 जूनला पंढरपुरच्या दौऱ्यावर येणार आहेत. पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांची जाहीर सभा होणार आहे. याचवेळी भगीरथ भालके हजारो कार्यकर्त्यांसह बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत.

हे सुद्धा वाचा

भगीरथ भालके यांनी पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली. यावेळी त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मोठा आरोप केला आहे. शरद पवार हे पंढरपूरमध्ये आले. त्यावेळी त्यांनी विठ्ठल सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला. त्यांची उमेदवारी जाहीर केली.

आम्हाला दूजाभावाची वागणूक देण्यात आली. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला मदत करा असे मी वारंवार सांगत होतो. मात्र, कारखान्याला मदत करण्यात आली नाही. पण, पवारांनी पाटील यांची उमेदवारी करणे ही कोणालाही न पटणारी अशी गोष्ट होती. त्यामुळे स्वाभिमानाला ठेच लागल्यावरच हा निर्णय घेतला आहे.

भारत नाना भालके गेल्यानंतर पक्षाने आमच्यावर जे छत्र धरायला हवे होते ते धरले नाही. त्यामुळे 27 तारखेला सरकोली गावात बीआरएसमध्ये पक्ष प्रवेश करणार आहे. बीआरएस पक्षाचे सगळे मंत्रिमंडळ त्या ठिकाणी येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यात बीआरएस शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे. इथल्या सरकारने वारकऱ्यांवर जरी काठी चालवली असली तरी आम्ही फुले टाकणार आहोत. म्हणून या वारकऱ्यांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे असे भगीरथ भालके म्हणाले.