पक्षाचं नाव, चिन्ह हातात, पण एकनाथ शिंदे यांच्या हातात शिवसेना भवन येऊ शकत नाही? कारण

| Updated on: Feb 18, 2023 | 3:52 PM

उद्धव ठाकरे यांची पक्षही गेला, चिन्हही गेले आणि पक्षप्रमुख पदही गेले अशी परिस्थिती आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांना दिलासा देणारी एकच बातमी आहे ती अशी की

पक्षाचं नाव, चिन्ह हातात, पण एकनाथ शिंदे यांच्या हातात शिवसेना भवन येऊ शकत नाही? कारण
DADAR SHIV SENA BHAVAN
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ साली स्थापन केलेला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आहे. निवडणूक आयोगाच्या कोर्टात पक्ष आणि चिन्ह कुणाचे हा वाद पोहोचला. याच दरम्यान उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा बोलावण्याची परवानगी मागितली होती. मात्र, निवडणूक आयोगाने ती परवानगी दिली नाही. त्यामुळे २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपली. उद्धव ठाकरे यांची पक्षही गेला, चिन्हही गेले आणि पक्षप्रमुख पदही गेले अशी परिस्थिती आहे.

मात्र, उद्धव ठाकरे यांना दिलासा देणारी एकच बातमी आहे ती अशी की बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आलेले दादर येथील शिवसेना भवन उद्धव ठाकरे यांच्याकडेच कायम रहाणार आहे. कारण, शिवसेना भवन हे जरी शिवसेनेचे मुख्यालय असले तरी त्याची मालकी शिवसेना पक्षाकडे नाही तर ती शिवाई ट्रस्ट कडे आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे शिवसेना भवनाचा इतिहास ?

१९ जून १९६६ साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. पक्ष वाढत होता, शिवसैनिकांची फौज तयार होत होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी कार्यकर्त्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढत होती. मग, बाळासाहेबांनी पर्ल सेंटर येथे च्या २ खोल्यांमध्ये शिवसेना पक्षाचे कामकाज सुरु केले. बाळासाहेब ठाकरे यांचे दादर येथील घर आणि पर्ल सेंटर येथील दोन खोल्या या शिवसेनेचे कार्यालय म्हणून वापरले जात होते. पण, शिवसैनिकांचा ओघच इतका मोठा होता की बाळासाहेबांना स्वतंत्र अशा मोठ्या जागेची गरज भासू लागली. त्यामुळे जागेचा शोध सुरु झाला. शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी जागेचा शोध घेण्यास सुरवात केली. शिवाजी पार्क येथील एक जागा त्यांच्या पसंतीस उतरली.

लालबाग, परळ, दादर, माहीम या मराठमोळ्या वस्तीला एकत्र जोडणारी ही जागा होती. दादर स्टेशनपासून अगदी जवळ ही जागा ‘उमरभाई’ या मुस्लिम व्यक्तीची होती. या जागेवर काही गाळे होते. उमरभाई यांच्याकडून शिवाई ट्रस्टने ही जागा खरेदी केली. त्यानंतर 1974 साली शिवसेना भवन बांधण्यास सुरवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्याप्रमाणे दगडी बांधकाम असावे अशी संकल्पना आर्किटेक्ट गोरे यांनी मांडली. ती बाळासाहेबांना पसंद पडली आणि मग सुरु झाले शिवसेना भवनाचे बांधकाम.

शिवसेना भवनाचे बांधकाम

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वतः शिवसेना भवनाच्या बांधकामावर लक्ष ठेवून होते. शिवसेना भवन उभे रहात होते. निधी कमी पडत होता. शिवसैनिकांनी ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम घेतले. देणगीदारांकडून देणगी मिळवली. कुणी फरशी तर कुणी फर्निचरची जबाबदारी घेतली. बाळासाहेब यांच्यासोबत माँसाहेब मीनाताई या ही तेथे येत होत्या. त्यांनी या वास्तूमध्ये मंदिर हवे अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा शिवसेनाभवनमध्ये अंबेमातेचे मंदिर उभारण्यात आले.

किल्ल्यासारखा आकार, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची असा संपूर्ण विचार करून १९ जून १९७७ रोजी शिवाजी पार्क येथे शिवसेना पक्षाचे अधिकृत असे शिवसेना भवन मोठ्या दिमाखात उभे राहिले. मूळ जमिनीवर हे गाळेधारक होते त्यांनाही शिवसेनाभवनाच्या जागेत सामावून घेण्यात आले.

शिवसेना भवनात शिवसैनिकांची रेलचेल वाढली. १९ जून रोजी शिवसेना भवनच्या उद्घाटनावेळी प्रमुख भाषण करताना बाळासाहेब म्हणाले, “शिवसेना भवन ही शिवसैनिकांची हक्काची वास्तू आहे. आम्ही केवळ राखणदार आहोत. या वास्तूचे पावित्र्य प्रत्येकाने राखले पाहिजे. हे भवन महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा बदलायला लावणार आहे”. महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिक शिवसेना भवन हे केवळ पक्षाचे मुख्यालय मानत नाहीत. तर त्यांच्यासाठी ते मंदिर आहे.

शिवाई ट्रस्टचे ट्रस्टी

शिवसेनेचे पहिले महापौर हेमचंद्र गुप्ते, मीनाताई ठाकरे, पहिले आमदार प्रिन्सिपल वामनराव महाडिक, माधव देशपांडे, सुधीर जोशी, लिलाधर डाके, शाम देशमुख, कुसुम शिर्के, भालचंद्र देसाई हे या शिवाई ट्रस्टचे ट्रस्टी होते. या ट्रस्टी मंडळींनीच मूळ मालक उमरभाई यांच्याकडून शिवसेना भवनसाठी जागा घेतली. त्यामुळे शिवसेना भवन हे शिवाई ट्रस्टीच्या मालकीचे आहे.

शिवाई ट्रस्टच्या ट्रस्टींपैकी मीनाताई ठाकरे, हेमचंद्र गुप्ते, वामन महाडिक यांचे निधन झाले. तर, शाम देशमुख, कुसुम शिर्के, भालचंद्र देसाई यांनी राजीनामा दिला आहे. सद्य परिस्थितीत शिवाई ट्रस्टचे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नेते लीलाधर डाके हे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबतच शिवसेना भवनाची जागा मिळवण्यापासून ते आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारे नेते दिवाकर रावते, सुभाष देसाई, नेते अरविंद सावंत, रविंद्र मिर्लेकर, विशाखा राऊत हे ही शिवाई ट्रस्टचे ट्रस्टी आहेत. यातील कुणीही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले नाहीत. त्यामुळे जोपर्यंत शिवाई ट्रस्टचे ट्रस्टी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत तोपर्यत शिवसेना भवन हे उद्धव ठाकरे यांच्याकडेच रहाणार आहे हे स्पष्ट होत आहे.