गणेश सोळंकी, बुलढाणा, दि. 22 फेब्रुवारी 2024 | महाराष्ट्रातील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील हा प्रकार आहे. रस्त्यावर दोरी बांधून त्याला ग्लूकोजची बॉटल लावून रुग्णांना सलाईन दिली जात आहे. डॉक्टर रस्त्यावर बसून उपचार करत आहेत. हॉस्पिटलमध्ये फरशीवर रुग्ण झोपले आहेत. बुलढाणामधील लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील हा व्हिडिओ आहे. या ठिकाणी सुमारे ५०० जणांना महाप्रसादातून विषबाधा झाली. त्यानंतर मोठ्या संख्येने रुग्ण आल्यामुळे जागा नव्हती. अखेर रस्त्यावर उपचार सुरु करण्यात आले.
खापरखेड सोमठाणा गावात विठ्ठल – रूख्मिणीच्या मंदिरातील उपवासाचे फराळ खाल्ल्याने गावातील तब्बल ५०० पेक्षा जास्त महिला सह पुरूषांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर रुग्णांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु रुग्णालयात व्यवस्थाच नसल्यामुळे रस्त्यावर उपचार सुरु करण्यात आले. बाधीत लोकांवर रात्रीच उपचार करून 100 चे वर नागरिकांना घरी सोडण्यात आले होते. तर 200 चे वर लोकांवर उपचार सुरू करण्यात आले होते.
राज्यातील आरोग्य व्यवस्था रस्त्यावर#Helth #Doctor pic.twitter.com/jBX4x7z4sW
— jitendra (@jitendrazavar) February 22, 2024
घटना घडल्यावर बाधीत लोकांना रात्रीच बिबी येथील ग्रामीण रूग्णालयात आणले असता, येथील वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर होते. त्यामुळे पोलिस व महसूल प्रशासनाने परिसरातील खासगी डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी पाचारण केले. तर परिसरातील मेहकर, लोणार येथील रुग्णालयात ही काही बाधीत रुग्ण उपचारासाठी हलविले.रात्री उशिरा हा धक्कादायक प्रकार घडला.
आरोग्य प्रशासनाविषयी संतापाची लाट निर्माण झाली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उपवासाच्या फराळाचा प्रसाद वाटप करण्यात आले होते. हा प्रसाद खाल्ल्यानंतर काही वेळातच लोकांना प्रचंड वेदना आणि त्रास होण्यास सुरूवात झाली. अनेकांना उलट्या, मळमळ, संडासचा त्रास झाला. पोलिस आणि महसूल विभागाचे लोकांनी बाधीत लोकांना उपचारासाठी हलविले. मात्र यावेळी डॉक्टर नसल्याने ग्रामस्थामध्ये संताप पाहायला मिळाला. सोशल मीडियावर अनेक जण या व्हिडिओवर संताप व्यक्त करत आहेत.