अजितदादांच्या बाऊन्सरवर शिंदेंनी सिक्सर मारल्यानंतर महायुतीच्या पत्रकार परिषदेत हशा पिकला. प्रश्नाचा सरळ चेंडू शिंदेंसाठी होता. पण दादांनी त्या प्रश्नाला एक्स्ट्रा बाऊन्स देवून शिंदेंकडे टाकला. शिंदे कदाचित प्लेड करतील अशी कदाचित दादांना आशा असावी. मात्र शिंदेंनी त्या बाऊन्सरला बाऊंड्री पार करत थेट सिक्सर मारला. आपला बाऊन्सर शिंदेंच्या उत्तरानं सरपटी ठरल्याचं लक्षात आल्यानंतर दादांनी नंतर सावरलं खरं. पण तोपर्यंत शिंदेंचा टोलावलेला चेंडू पोहचायचा तिथं पोहोचला.
शिंदे-दादांमध्ये रंगलेल्या या बॅटिंगवेळी समर्थक नेत्यांच्या चेहऱ्यावरचे हावभावही रंजकपणे बदलत होते. अजित पवारांच्या उत्तरानंतर सर्वात मोठी टाळी वाजवत भाजपच्या प्रवीण दरेकरांनी प्रसाद लाडांच्या पाठीवर थाप मारली. शिनसेनेच्या मनिषा कायंदे, भाजपच्या पंकजा मुंडे आणि आशिष देशमुख खळखळून हसले. अजित दादांनी टाकलेला बाऊन्सर रावसाहेब दानवे आणि धनंजय मुंडेंच्या सर्वात उशिरानं लक्षात आल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्यही उशिरानं उमटलं.
चेहऱ्यावर हात फिरवत फडणवीस आणि भाजपच्या रविंद्र चव्हाणांचं हास्य हे सारं खेळी-मेळीत चालल्याचं सांगत होतं. पत्रकार परिषदेत धीरगंभीर चेहऱ्यानं बसलेले संजय शिरसाट दादांच्या उत्तरावर सर्वात शेवटी हसले. मात्र शिंदेंनी लगेच मारलेल्या हेलिकॉप्टर शॉटमुळे अजितदादांच्या बाऊन्सरवर उडालेले हास्याचे फुगे फक्त १० सेकंदच टिकले.
शिंदेंनी पहाटेच्या शपथविधीचा विषय छेडत दादांना उत्तर देताच सर्वात पहिला बाक फडणवीसांनीच वाजवला. दादांच्या बाऊन्सरची मनमुरादपणे दाद देणाऱ्या लाड-दरेकरांना शिंदेंचा सिक्सर समजलाच नाही. त्यामुळे नेमका चेंडू कोणत्या दिशेला गेला हे दोघांना चंद्रकांत पाटलांनी समजावून सांगितलं.
खेळीमेळीत चाललेल्या या सामन्यात अजून कुणी बाऊन्सर टाकण्याआधीच फडणवीसांनी मध्यस्ती केली. पत्रकार परिषद आटोपून तिन्ही नेते रवाना झाले. तेवढ्यात फडणवीसांनी फोटो काढण्याची आठवण करुन दिली. फोटो झाल्यावर आता काय मिठ्या मारायच्या का? म्हणून अजितदादांनी मिश्किल प्रश्न केला. 9 तासांच्या वनडे क्रिकेट सामन्यातल्या हायलाई्टस लक्षात राहाव्यात, तसं एकूण 27 मिनिटं 21 सेकंदांची ही पत्रकार परिषद शिंदे-दादांमधल्या 35 सेकंदाच्या उत्तरानं गाजली. दादांचा बाऊन्सर शिंदेंनी सिक्सरमध्ये रुपांतरित केला असला तरी गेल्या सरकारमध्ये काहीसे बॅकफूटवर दिसणारे दादा आता फ्रंटफूटवर खेळतील. याची झलक आत्ताच दिसलीय.