मुख्यमंत्री आज पावसानं उद्धवस्त झालेल्या चिपळुणच्या दौऱ्यावर होते. ह्या दौऱ्यात त्यांनी जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न
केला. बहुतांश वेळेस त्यांच्याभोवती सेनेचे नेते, सुरक्षा अधिकारी यांचाच घराडा जास्त दिसला. पुरानं जे पीडीत झाले ती जनता
मुख्यमंत्र्यांना लांबूनच समस्या ऐकवत होती. मुख्यमंत्रीही हात जोडून ते ऐकण्याचा प्रयत्न करत होते. धीर देत होते. पण याच
दौऱ्यात आ. भास्कर जाधव, त्यांची देहबोली आणि अधूनमधून ते पीडीतांना जे बोलत होते, त्याची जास्त चर्चा आहे. जाधवांना
जनतेचीच अॅलर्जी आहे की काय असा सवाल आता सोशल मीडियावर विचारला जाऊ लागलाय.
आणि जाधव म्हणाले, आईला समजव!
चिपळूणच्या बाजारपेठेत उद्धव ठाकरे एका एका दुकानासमोर जाऊन पीडित जनतेशी संवाद साधत होते. त्याचवेळेस
ते एका दुकानासमोर आले. तिथं एक महिला बराच वेळ आक्रोश करत होती. मुख्यमंत्र्यांचं त्या महिलेकडे लक्ष गेलं,
त्यावेळेस पीडीत महिला म्हणाली, तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचं
नुकसान भरून द्या असं सांगितलं. मुख्यमंत्री त्या महिलेला धीर देण्याचा प्रयत्न करत होते. महिला आणि मुख्यमंत्री
बोलणं सुरु होतं. पण जाधव मधात पडले . महिलेच्या उद्गाराने भास्कर जाधवांचा तिळपापड झाला. त्यांनी लगेच या महिलेला
प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला चला…
बाकी काय… तुझा मुलगा कुठंय… अरे आईला समजव… आईला समजव… उद्या ये…, असं भास्कर जाधव
तावातावाने बोलत होते. त्यांनी ज्याप्रमाणं पीडितेवर, तिच्या मुलावर आवाज चढवला ते धक्कादायक आहे.
भास्कर जाधवांना शिष्टाचाराचा विसर?
भास्कर जाधव फक्त महिलेपर्यंतच थांबले असं नाही तर ते मुख्यमंत्र्यांनाही बोलायचे राहीले नाहीत. यातल्याच एका
प्रसंगात, मुख्यमंत्री पीडित लोकांसमोर हात जोडत होते. तशाच अवस्थेत ते संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. तर
तिथेही भास्कर जाधव कसलाच विचार न करता मुख्यमंत्र्यांना म्हणाले, साहेब तुम्ही हात नका जोडू. बरं हे सगळं
टी.व्हीवर, सोशल मीडियावर LIVE सुरु होतं. मुख्यमंत्री जर कुणाशी बोलत असतील तर त्यावेळेस कुठलाही
अधिकारी किंवा नेता, मंत्री यांनी बोलणं अपेक्षीत नाही. ते शिष्टाचाराला धरुन नसतं. विधानसभेचं कामकाज
पहाणाऱ्या जाधवांना हे माहित नसेल असं नाही. पण त्यांनी शिष्टाचार पायदळी तुडवत आज जे वर्तन केलं त्यावर
तिखट प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाल्यात.