मुंबई | 21 जुलै 2023 : राज्याच्या मध्यवर्ती भागात मोठ्या एअरपोर्टची गरज असून कराड शहरात जमीन संपादन करण्यासाठी पुन्हा जोमाने प्रक्रिया राबवि ण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली आहे. नवीमुंबईचा विमानतळ पुढच्या वर्षी सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील अन्य ठिकाणी विमानतळ सुरु करण्याच्या योजनांची देखील त्यांनी यावेळी माहीती दिली.
मुंबईतील विमानतळाला दोन धावपट्ट्या असल्या तरी एकावेळी एकच धावपट्टी वापरता येते. त्यामुळे विमान उड्डाणांवर मर्यादा येत असते. त्यामुळे नवीमुंबईतील विमानतळाचा प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला होता. आता नवीमुंबईच्या विमानतळाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. धावपट्ट्या देखील तयार करण्यात आल्या आहेत. त्याचे फायनल कोटींग लवकरच होईल आणि टर्मिनलचे कामही अंतिम टप्प्यात असून ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण होईल असे प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी सांगितले.
काही वर्षांपूर्वी कोल्हापूरला मोठा पूर आला होता. त्यावेळी पुरामुळे कोल्हापूरचा एअरपोर्ट वापरता येत नव्हता. त्यामुळे कराड सारख्या मध्यवर्ती भागात मोठ्या विमानतळाची गरज निर्माण झाली. परंतू तेथील लोक जमिन देण्यास विरोध करीत आहेत. हा प्रश्न लवकरच सोडविण्यात येणार असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई विमानतळाकडे दुपारचा टाईम स्लॉट उपलब्ध नसल्याने रिजनल कनेक्टीविटी साठी अडचणी येत आहेत. तसेच संभाजीनगरातील विमानतळासाठी जमीन संपादनासाठी 800 कोटी मंजूर झाले आहेत. त्यामुळे संभाजीनगरात मोठी विमाने उतरविणे सोपे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अकोला धावपट्टीसाठी लांबीसाठी जमिन मिळाली, परंतू रुंदीसाठी जमिन कमी पडली आहे. त्यामुळे आणखी जमिन संपादन करावे लागणार आहे.
नांदेड विमानतळासाठी सरकार पैसे द्यायला तयार आहे. रिलायन्सकडून ते नंतर वसुल करण्यात येतील. परंतू नांदेडला नाईट लॅण्डींगची सुविधेसह काम व्हावे अशी योजना आहे. परंतू मुंबई विमानतळाकडे दिवसाचा स्लॉट नसल्याने अडचणी आहेत. एका नांदेडला नाईट लॅण्डींग सुविधा झाली की रिजनल कनेक्टीविटी होऊन विमानतळ फायद्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील काही विमानतळ एमआयडीसी तर काही अन्य एजन्सीकडे असल्याने सर्वांसाठी एकच नोडल एजन्सी तयार करण्यासाठी मुख्यमंत्र्याशी बैठक केली जाईल असेही त्यांनी सांगितले.