खुशखबर! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5 ऑक्टोबरला 4 हजार रुपये येणार

| Updated on: Oct 03, 2024 | 7:14 PM

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत्या 5 ऑक्टोबरला 4 हजार रुपये जमा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिवशी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या दोन योजनांचे पैसे वितरीत करण्यात येणार आहेत.

खुशखबर! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5 ऑक्टोबरला 4 हजार रुपये येणार
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5 ऑक्टोबरला 4 हजार रुपये येणार
Follow us on

पी.एम. किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांचे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील अनुक्रमे 18 वा आणि पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते शनिवार 05 ऑक्टोबर, 2024 ला सकाळी 11.00 वाजता वाशिम येथील समारंभात वितरीत करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- त्यांच्या आधार आणि डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे. पी. एम. किसान योजने अंतर्गत दिनांक 30 सप्टेंबर, 2024 अखेर राज्यातील जवळपास 1.20 कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण 17 हप्त्यांमध्ये सुमारे रू. 32000 कोटीचा लाभ जमा झालेला आहे.

पी. एम. किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन 2023-24 पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पी. एम. किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने 2023-24 व 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यांमध्ये एकूण 91.45 लाख शेतकरी कुटुंबाना रक्कम रु. 6949.68 कोटी लाभ अदा करण्यात आला आहे. जुन 2023 पासून आयोजित गावपातळीवरील विशेष मोहिमांद्वारे पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पूर्तता झाल्याने देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांची संख्या आजरोजी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरली आहे.

केंद्र शासनाच्या पी. एम. किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याच्या लाभ वितरणावेळी राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बॅंक खाती आधार संलग्न केलेल्या व ईकेवायसी पूर्ण केलेल्या एकूण 91.52 लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात रू. 1900 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ तर राज्याच्या योजनेमधून रू. 2000 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.

या समारंभामध्ये पी. एम. किसान योजने अंतर्गत रू. 2000/ तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत रू. 2000/ असा एकुण रू. 4000/ चा लाभ प्रधानमंत्री महोदयांच्या शुभहस्ते राज्यातील सुमारे 91.52 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट जमा होईल. पी. एम. किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात https://pmindiawebcast.nic.in या लिंकआधारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.