विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. ते वर्ध्यामध्ये बोलत होते. “विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून साडे सहा लाख कारागिरांना आधुनिक साधनं दिली आहेत. त्यामुळे त्यांची उत्पादकता वाढली आहे. प्रत्येक लाभार्थीला 15 हजार रुपयांचं ई व्हाऊचर दिलं जात आहे. कोणत्याही गॅरंटी शिवाय तीन लाखाचं कर्ज दिलं जात आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. “एक वर्षातच विश्वकर्मा भावा-बहिणींना 1400 कोटींच लोन दिलं आहे. प्रत्येक गोष्टीकडे या योजनेतून लक्ष दिलं जात आहे. त्यामुळेच ही योजना यशस्वी होत आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“मी प्रदर्शन पाहत होतो. किती अद्भूत काम आपल्याकडे लोक परंपरेने करत आहेत हे मी पाहत होतो. पण त्यांना पैसा, आधुनिक टूल्स मिळाल्यावर ते किती चांगली कामगिरी करू शकतात हे मी पाहिलं. तुम्ही हे प्रदर्शन पाहाच. किती मोठी क्रांती आलीय हे तुमच्या लक्षात आलं आहे. एससी, एसटी आणि ओबीसी समाजाची या योजनेत अधिक भागीदारी राहिली आहे” असं पीएम मोदी म्हणाले.
विश्वकर्मा योजनेचा सर्वाधिक लाभ एससी, एसटी आणि ओबीसी
“विश्वकर्मा समाजाकडे मागच्या सरकारने पाहिलं असतं तर मोठी प्रगती झाली असती. पण काँग्रेस आणि त्यांच्या मित्रांनी एससी, एसटी ओबीसींना पुढे जाऊ दिलं नाही. आम्ही काँग्रेसच्या दलितविरोधी विचाराला मूठमाती दिली आहे” असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. “गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार विश्वकर्मा योजनेचा सर्वाधिक लाभ एससी, एसटी आणि ओबीसी समाज घेत आहे” असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.