पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावातून लखपती दीदी कार्यक्रमातून विरोधकांना लक्ष्य केले. काँग्रेसच्या सरकारचे ७० वर्षांतील काम अन् आपले दहा वर्षातील काम यांची तुलना नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली. आधीच्या सरकारचे सात दशके एका तराजूत ठेवा आणि दुसऱ्या तराजूत मोदी सरकारचे दहा वर्ष ठेवा, असे आव्हान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना दिले. आमच्या सरकारने जे काम केले तसे काम स्वातंत्र्यानंतर कोणत्याच सरकारने केले नाही. २०१४ पूर्वी २५ हजार कोटी कर्ज महिलांना दिले गेले होते. परंतु मागील दहा वर्षांत नऊ लाख कोटी रुपयांची मदत दिली गेली आहे. कुठे आहेत २५ हजार कोटी अन् कुठे नऊ लाख कोटी रुपये, असे सांगत नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लक्ष्य केले. हा अजून फक्त ट्रेलर आहे. आम्ही बहीण अन् बेटीच्या भूमिकेचा अधिक विस्तार करत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
गरीबांसाठी घरे सरकार बनवत आहे. त्या घरांची नोंदणी महिलांच्या नावाने झाले पाहिजे, असा निर्णय आम्ही घेतला. आम्ही गरीबांसाठी आतापर्यंत चार कोटी घरे बांधली आहे. त्यातील सर्वाधिक घरे महिलांच्या नावे आहेत. आता आणखी तीन कोटी घरे बांधणार आहोत. त्यातील सर्वाधिक घरे महिलांच्या नावे असतील.
आमच्या सरकारने बँकांशी संबंधित अनेक कामे केली. आधी जनधन खाते उघडले. त्या खात्यात सर्वाधिक खाते महिलांची उघडली गेली. त्यानंतर मुद्रा योजना सुरू केली. बँकांना सांगितले या योजनेत विना गॅरंटीने कर्ज द्या. गॅरंटी हवी तर मोदी आहे. या योजनेचा ७० टक्के महिलांनी लाभ घेतला आहे. काही लोक म्हणत होते, महिलांना असे कर्ज देऊ नका. ते कर्ज बुडेल. त्यात जोखीम जास्त आहे. पण मी वेगळा विचार करायचो. माझा मातृशक्तीवर अधिक विश्वास होता. माझा विश्वास खरा ठरला. महिलांनी अधिक मेहनत केली आणि त्यांनी त्याचे सर्व कर्ज फेडले. यामुळे आता मुद्रा योजनेची मर्यादा २० लाखांवर नेली आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
महिलांवरील होणारे अत्याचार अक्षम्य पाप आहे. दोषी कोणीही असेल त्याला सोडू नका. रुग्णालये, शाळा, पोलीस व्यवस्था, कोणत्याही ठिकाणी निष्काळजीपणा होत असेल तर हिशोब करा. वरपर्यंत मेसेज जाऊ द्या. हे पाप अक्षम्य आहे. सरकार येईल जाईल. पण जीवनाची रक्षा, नारीची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. सर्व राज्य सरकारांना सांगतो, आणि राजकीय पक्षांना सांगतो. महिला हित सर्वाधिका महत्वाचे आहे, असे नरेंद्र मोदी यांनी बदलापूर आणि कोलकाता घटनांच्या पार्श्वभूमीवर सांगितले.