पुणेः रशिया-युक्रेन युद्धात अडकलेल्या युक्रेनमधील नागरिकांना मायदेशी आणण्यात इतरांना अडचणी येत आहेत. मात्र, भारताने ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून ते करून दाखवलं, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला. ते पुण्यामध्ये सिम्बॉयसिस कॉलेजमधील कार्यक्रमात बोलत होते. नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी आज पुणे (pune) दौऱ्यात बहुचर्चित अशा पुणे मेट्रोचे (metro) उद्घाटन केले. पुणे मेट्रोतून दिव्यांगांसोबत प्रवास केला. यावेळी झालेल्या कार्यक्रमातही मोदींनी आपल्या कार्यकाळात देशाने कशी प्रगती केली, याचा पाढा वाचला. मात्र, दुसरीकडे मोदींचे कोरोना बाबतीत महाराष्ट्रविरोधी भूमिका आहे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या दौऱ्याला जोरदार विरोध केलाय.
प्राचीन संस्कृती पुढे जातेय…
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गोल्डन क्षणाला आरोग्य धामाच्या लोकार्पणाची संधी मिळाली. मी सिम्बॉयसिसला शुभेच्छा देतो. वसुधैव कुटुंबकमवर या ठिकाणी कोर्स आहे. ज्ञानाचा प्रसार करण्याची परंपरा आपल्या देशात जिवंत आहे, याचा मला आनंद आहे. 85 देशांतील ४४ हजारांहून अधिक विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत. आपली संस्कृती शेअर करत आहेत. म्हणजे भारताची प्राचीन संस्कृती आजही पुढे जात आहे.
सर्वात मोठी स्टार्टअप इको सिस्टीम…
मोदी म्हणाले की, सिम्बॉयसिस संस्थेच्या विद्यार्थ्यांकडे अनेक आणि अमर्याद संधी आहेत. जगातील तिसरा सर्वात मोठी हब स्टार्टअप इको सिस्टीम आपल्या देशात आहे. स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया मेक इंडिया आणि आत्मभारत सारखे मिशन तुमच्या भावनांचे प्रतिनिधीत्व करत आहे. आजचा भारत विकसित पावत आहे, प्रतिनिधीत्व करत आहे आणि संपूर्ण जगावर प्रभावही पाडत आहे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
ऑपरेशन गंगा यशस्वी…
पंतप्रधान मोदी म्हणाले की, युक्रेनच्या युद्धातही भारत आपल्या देशातील नागरिकांना संकटातून बाहेर काढत आहे. इतर देशांना असे करण्यात अडचणी येत आहेत, पण मिशन गंगाच्या माध्यमातून भारत करून दाखवत आहे. कारण हा भारताच्या वाढत्या प्रभावाचा परिणाम आहे. देशात येणाऱ्या प्रत्येक बदलाचे क्रेडिट तुम्हाला जाते. आपल्या देशातील नागरिकांना जाते.
भारत ग्लोबल लीडर…
देश आधी आपल्या पायावर उभा राहण्यासाठी ज्या सेक्टरमध्ये विचार करत नव्हता, त्या सेक्टरमध्ये भारत ग्लोबल लीडर बनू पाहत आहे. मोबाइल मॅन्युफॅक्चरिंग हे त्याचे उदाहरण आहे. मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगचा अर्थ केवळ आयात करावा असा अर्थ होता. डिफेन्स सेक्टरमध्येही दुसरे देश देतील त्यावर आपण अवलंबून राहायचो. आता परिस्थिती बदलली आहे. मोबाइल मॅन्यूफॅक्चरिंगमध्ये भारत जगातील दुसरा सर्वात मोठा देश झाला आहे. सात वर्षांपूर्वी देशात केवळ अशा दोन कंपन्या होत्या. आज 200 हून अधिक युनिट्स या कामात गुंतले आहेत. डिफेन्समध्ये जगातील सर्वात मोठा इम्पोर्टर देश होता. आता एक्सपोर्टर देश बनत आहे, असा दावाही त्यांनी केला.