नाशिकः नाशिकमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी सुरू केलेल्या हेल्मेटसक्ती मोहिमेला चक्क पोलिसांकडून हरताळ फासला जात आहे. मात्र, हेल्मेटसक्तीचा बडगा सामान्यांवर उगारने सुरू आहे. याबद्दल जनतेत रोष आहे. विशेष म्हणजे गुरुवारी तर पेट्रोल घेण्यासाठी चक्क पोलिसच दुसऱ्याचे हेल्मेट घेऊन जात असल्याचे दिसले. याप्रकरणी तिथे उपस्थित असलेल्या दक्ष नाशिककरांनी हटकले तेव्हा पोलिसाची बोलती बंद झाली. त्याने तिथून काढता पाय घेतला.
प्रकरण नेमके काय?
नाशिक जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो हेल्मेट, नो पट्रोल धोरण सुरू केले. त्यानंतर हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांचे समपुदेशन सुरू केले. त्यानंतर शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये विनाहेल्मेट प्रवेश दिला जाणार नाही, असा जाचक नियम काढला. विशेष म्हणजे हे सारे नियम सामान्यांसाठी. कारण पोलीस हेल्मेट न घालताच मोकाट फिरत असल्याचे शहरातील चित्र आजही आहे.
रंगेहात पकडले, पोलीस पसार
नाशिकमधील द्वारका परिसरातील पेट्रोल पंपावर एक पोलीस पेट्रोल भरायला आला. मात्र, त्याच्याकडे हेल्मेट नव्हते. हेल्मेट असल्याशिवाय पेट्रोल मिळाले नसते. त्यामुळे या पोलिसाने पेट्रोल पंपावरचच बंदोबस्तासाठी असलेल्या दुसऱ्या पोलिसाचे हेल्मेट घेतले. पोलीस नाईक कैलास भिल यांनीच हे हेल्मेट दिले. हे सारे नागरिकांनी पाहिले. त्यातल्या काही दक्ष नाशिककरांनी या घटनेला हरकत घेतली. तेव्हा संबंधित पोलिसाने हे हेल्मेट आपलेच आहे, असा दावा केला. मग नागरिकांनी तुम्ही बाजूला का ठेवले, इतरांकडे का दिले, अशा प्रश्नांची सरबत्ती केली. तेव्हा पोलिसाने अरेरावी केली आणि तिथून काढता पाय घेतला.
पोलीस आयुक्त कारवाई करणार का?
नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांनी हेल्मेटसक्ती मोहीम राबवली. त्याचे कौतुकही झाले. मात्र, ही मोहीम खूप ताणण्यात आली. त्यातून विनाहेल्मेट वाहन चालकांना पेट्रोल देणाऱ्या पंपचालकांवर गुन्हे दाखल केले. शिवाय विनाहेल्मेट कार्यालयात प्रवेश देणाऱ्या कार्यालय प्रमुखांवर गुन्हे दाखल करू, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला. मात्र, शहरात कुठेही पोलीसच हेल्मेट घालताना दिसून येत नाहीत. मग ही मोहीम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का, पोलिसांना त्यातून सूट कशासाठी, या पोलिसांवर आयुक्त कारवाई करणार का, असा प्रश्न दक्ष नाशिककर विचारत आहेत.
VIDEO : Pune | CNG Price Hike : पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात वाढ, किलोमागे मोजावे लागणार इतके रूपये – tv9#cng #CNGprice #Hike #Pune pic.twitter.com/cRg4CZkkRJ
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 18, 2021
इतर बातम्याः
Malegaon Violence: रझा अकादमीवरील छापेमारीत महत्त्वाचे पुरावे हाती, 52 जणांना बेड्या!
Nashik| लहानग्याला वाचवण्यासाठी थोरल्याची उडी, सख्खे भाऊ तळ्यात बुडाले, क्षणात होत्याचं नव्हतं!