महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता 11 दिवस पूर्ण झाले आहेत. यानंतर आता उद्या महाराष्ट्राच्या नव्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधीसाठी आझाद मैदानात जय्यत तयारी केली जात आहे. भाजपचे गटनेता देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे गटनेता एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता अजित पवार यांनी एकत्रपणे राजभवनात जावून राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला. यानंतर नव्या सरकारचा शपथविधी उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे उद्या राज्याचे नवे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाला मंत्रिपदाची शपथ देणार आहेत. नव्या सरकारमध्ये कोण-कोण मंत्री बनणार याची यादी आज संध्याकाळपर्यंत समोर येणार आहे. पण त्याआधी साताऱ्यात वेगळ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या.
भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रीपद देण्यात यावे या मागणीसाठी साताऱ्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने टॉवरवर चढून आंदोलन केलं. शिवेंद्रराजे यांना मंत्रीपद द्या. अन्यथा टॉवरवरुन उडी मारेन, असा इशारा पोलीस कर्मचाऱ्याने दिला. प्रशासनाने संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला टॉवरवरुन खाली उतरण्याची वारंवार विनंती केली. पण पोलीस कर्मचारी ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हते. अखेर खासदार उदयनराजे भोसले यांना या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. उदयनराजे भोसले यांनी पोलीस कर्मचाऱ्याची फोनवरुन समजूत काढली. उदयनराजे यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला टोकाचं पाऊल न उचलण्याची विनंती केली.
उदयनराजे : आयुष्य एकदाच येतं आणि कुणाचं आयुष्य एवढं स्वस्त नाही. मग तुमचं आयुष्य एवढं स्वस्त नाही. तुमच्या भावना मला कळाल्या, जे काही असेल ते नंतब बघुना. तुम्ही एकदा मला भेटायला या.
आंदोलक पोलीस कर्मचारी : नाही नाही महाराज. मी नोकरीचा आज राजीनामा दिलेला आहे.
उदयनराजे : अहो, जे असेल ते. पण हे चुकीचं आहे. तुम्ही खाली या
पोलीस कर्मचारी : महाराजांसाठी लोक मरायची स्पर्धा करत होते
उदयनराजे : नाही.. नाही… एक लक्षात घ्या. प्लीज. मरायची स्पर्धा प्लीज कुणी करु नये. त्यावेळेसही छत्रपती शिवाजी महाराजांना ते अपेक्षित नव्हतं आणि मलाही ते अपेक्षित नाही. तुम्ही या ना. चढ-उतार चालू असतात. एवढं काय त्यात?