मालेगाव बाह्य मतदारसंघात १४ लाखांची रोकड सापडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव-नामपूर रस्त्यावर करण्यात आलेल्या कारवाईत ही रोकड सापडली आहे. स्थिर संनियंत्रण पथकाच्या (SST) वाहन तपासणीत ही रक्कम आढळली आहे. घटनास्थनी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. पथकाने गाडी अडवून तपासणी केली असता संबंधित कारमधून 14 लाखांची रोकड नेली जात होती, असं स्पष्ट झालं. गाडीतील व्यक्ती संबंधित रक्कम कुठल्या कामासाठी नेते होते? याचा तपास पोलिसांकडून केला जातोय. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या काळात संबंधित रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मुंबईनजीक विरारमध्ये आज पुन्हा एकदा 2 कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. बॅंकेच्या एटीएम व्हॅनमधून बेहिशोबी पैसे नेले जात असल्याची माहिती वसई विरार महापालिकेच्या भरारी पथकाला मिळाली होती. या दरम्यान आज दुपारी विरार पश्चिमेच्या भाजी मार्केट परिसरात सापळा लावून बॅंकेच्या एटीएम व्हॅनची चौकशी केली असता त्यात ही बेहिशोबी रक्कम आढळून आली आहे.
एटीएम व्हॅनसह अंदाजे दोन कोटी रक्कम ताब्यात घेऊन त्याची मोजणी सुरू आहे. विशेष म्हणजे काल नालासोपारा आणि विरारमध्ये एटीएम व्हॅनमध्येच वेगवेगळ्या दोन ठिकाणी 6 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली होती. त्यानंतर आज पुन्हा विरारमध्ये एटीएम व्हॅनमध्ये 2 कोटींची रक्कम सापडल्याने वसई विरारमध्ये खळबळ उडाली आहे.
जळगावातील शनिपेठ पोलिसांनी एका व्यक्तीकडून 25 लाख रुपयांची रोकड जप्त केली. या रोकड संदर्भात संबंधित व्यक्तीने योग्य ती माहिती न दिल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रमोद हिरामण पवार असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 500, 200 तसेच 100 च्या नोटांची सुमारे 25 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही रोकड तो एका निळ्या रंगाच्या हॅन्डबॅगमध्ये घेऊन जात होता.
जळगाव शहरातील बोहरा गल्ली परिसरात गस्तीवर असलेल्या शनिपेठ पोलिसांच्या पथकाने त्याला अडवलं. बॅगेत काय आहे? अशी विचारणा केल्यावर त्याने मी शेतकरी आहे. माझ्याकडे खूप शेती आहे. मी जळगावात सोने घ्यायला आलेलो होतो. असं कारण सांगितलं. पण त्याच्या ताब्यात असलेल्या रोकड संदर्भात त्याने पोलिसांना ठोस माहिती दिली नाही. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शनिपेठ पोलीस ठाण्यात आणलं.
प्रमोद पवार या व्यक्तीची सखोल चौकशी सुरू आहे. त्याने एवढी रक्कम कुठून आणली, ही रक्कम तो कुठे घेऊन जात होता? या संदर्भातील माहिती घेण्याचं काम सुरू असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिली आहे.
जालना शहरातील किरण पेट्रोल पंप परिसरात पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान 52 लाख 89 हजारांची रोकड जप्त करण्यात आलीय. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केलीय. जालना शहरातील बस स्टँड रोडवरील किरण पेट्रोल पंप येथे नाकाबंदी दरम्यान एका कारच्या तपासणी मध्ये ही 52 लाख 89 हजारांची रक्कम गुन्हे शाखेच्या पथकाला मिळून आली.
अभिजीत मोहन सावजी (वय 24 वर्ष, रा. संभाजीनगर) असं वाहन चालकाचे नाव असून सदर संशयित व्यक्तीकडे नियमापेक्षा जास्तीची रक्कम निवडणुकीच्या काळात मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदरील चालकाने या रकमेचा तपशील न दिल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने सदर रक्कम जप्त करून पुढील कार्यवाहीसाठी चंदनझिरा पोलिसांच्या ताब्यात दिली.