रुपाली चाकणकरांच्या मुक्ताईनगर दौऱ्यात रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसेंमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं. सून एका पक्षात, लेक दुसऱ्या पक्षात असं म्हणत रुपाली चाकणकरांनी रोहिणी खडसे या वडिलांच्या कर्तृत्वावर उभ्या असल्याची टीका केली. त्यावर रुपाली चाकणकरांचं राजकारणातलं अस्तित्व काय? याचं उत्तर त्यांच्या फेसबूकवरच्या कमेंटमधून मिळतात, असं प्रत्युत्तर रोहिणी खडसेंनी दिलं. यानंतर पक्ष बदलण्यावरुही दोघांमध्ये वार-प्रतिवार झाले. आम्ही सुरुवातीपासून घड्याळ चिन्हासोबतच असल्यामुळे पक्ष कधीच बदलला नसल्याचा दावा रुपाली चाकणकरांनी केला.
मुक्ताईनगर विधानसभेत गेल्यावेळी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष चंद्रकांत पाटील विरुद्ध त्यावेळी भाजपात असलेल्या रोहिणी खडसेंमध्ये सामना झाला होता. त्यावेळी गिरीश महाजनांच्या गटानं छुप्या पद्धतीनं अपक्ष चंद्रकांत पाटलांचं काम केल्याचाही आरोप झाला. अटीतटीच्या लढतीत चंद्रकांत पाटील 1957 मतांनी विजयी झाले. मात्र मुक्ताईनगरची समीकरणं प्रत्यक्ष निकालानंतर बदलण्यास सुरुवात झाली.
राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं जिंकलेले चंद्रकांत पाटील सरकार बनल्यानंतर मविआसोबत गेले. शिंदेंच्या बंडानंतर त्यांनी काही काळ तटस्थ भूमिका घेतली. महायुतीचं सरकार आल्यानंतर शिंदेंना पाठिंबा दिला. यंदा मुक्ताईनगरात तेच शिंदे गटाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.
इकडे भाजपकडून पराभूत झालेल्या रोहिणी खडसे नंतर राष्ट्रवादीत गेल्या. राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवार गटात राहणं त्यांनी पसंत केलं. लोकसभेवेळी एकनाथ खडसेंच्या पुन्हा भाजपवापसीच्या चर्चा रंगल्या. यंदा रोहिणी खडसेंना मुक्ताईनगरातून उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे.
2019 च्या विधानसभेत अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा आणि मुक्ताईनगर या 4 विधानसभा अशा होत्या. जिथं काही हजारांच्या फरकानं जय-पराजय ठरला. अमळनेरमध्ये सध्या अजित पवार गटातील अनिल पाटील फक्त 8594 मतांनी विजयी झाले. चाळीसगावात भाजपचे मंगेश चव्हाण 4,287 मतांनी विजयी ठरले. पाचोऱ्यात सध्या शिंदे गटात असलेले किशोर पाटील 2,084 मतांनी तर मुक्ताईनगरात सध्या शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील 1957 मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे यंदा जळगावातल्या अनेक विधासनभा चुरशीच्या ठरणार आहेत.