बीड: पूजा चव्हाणच्या आत्महत्येला आज एक आठवडा उलटला आहे. मात्र अजूनही पूजाच्या कुटुंबीयांकडून या प्रकरणी कुणावरही संशय व्यक्त केला नसून गुन्हाही दाखल केला नाही. तसेच या प्रकरणावर फारशी प्रतिक्रियाही दिली नाही. तिच्या कुटुंबीयांच्या या मौनावर पूजाच्या चुलत आजीनेच सवाल उपस्थित केले आहेत. पूजाचे आई-वडील गप्प का? असा सवाल पूजाच्या चुलत आजीने केला आहे. (pooja chavan grandmother’s reaction on suicide case)
पूजाच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना हा सवाल केला आहे. पूजाही आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हती. ती अत्यंत डॅशिंग मुलगी होती. मुलांसारखं काम करायची. मुलगा असल्यासारखीच घरातील कर्तव्य पार पाडायची. तिने आत्महत्या केली यावर विश्वास बसत नाही. तिचे आईवडील गप्प का आहेत हाच गंभीर प्रश्न आहे, असं पूजाची आजी शांताबाई राठोड म्हणाली. सरकारने पूजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
अंत्यविधीला घरातील लोक नव्हते
पूजाच्या अंत्यविधीला आम्ही गेलो होतो. तिच्या अंत्यविधीला तिच्या घरातील मुख्य माणसे नव्हती. आम्हीच खेड्यापाड्यातील लोक होतो, असंही त्या म्हणाल्या. पूजा माझ्याशी नेहमी बोलायची. ती राजकारणात सक्रिय होती. पण तिला राजकारण आवडत नव्हते. तिला आयुष्यात खूप पुढे जायचं होतं. तसं ती सांगायचीही, असंही शांताबाई म्हणाल्या.
आधी अरुण राठोडला अटक करा
दारावती तांड्याचा अरुण राठोड पुण्याला पोहोचला कसा? हे माहीत नाही. तो पूजाचा कोणीच नाही. तो पूजाचा भाऊ नाही. पूजाला एकही भाऊ नाही. त्या सहा बहिणी आहेत. त्यात पूजा पाचवी आहे. इतर चौघींची लग्नं झालेली आहेत. अरुणसह त्याच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घ्यावं आणि त्यांची कसून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दोषींवर कारवाई झालीच पाहिजे
पूजा आत्महत्या प्रकरणाला कोणीही जबाबदार असो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग तो बंजारा समाजातील असो की इतर कोणत्याही समाजातील असो दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. पूजाला न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
काय घडलं त्या रात्री?
पूजा पुण्यात राहत असलेल्या हेवनपार्क सोसायटी ही तीन मजली आहे. यातील तिसऱ्या मजल्याला पायऱ्या नसल्याने या मजल्यावर कोणालाही जाता येत नाही. या संपूर्ण इमारतीत केवळ पाच कुटुंब राहतात. पूजा पहिल्या मजल्यावर राहत होती. टू-बीएचकेच्या फ्लॅटमध्ये ती राहत होती. सोसायटीच्या समोर सिमेंटचा रस्ता आहे. पहिला मजला आणि रोडचं अंतर 30 ते 32 फूट असल्याचं सांगण्यात येतं. पूजाने रविवारी 7 फेब्रुवारी रोजी रात्री दीड वाजता आत्महत्या केली. पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून तिने उडी मारून आत्महत्या केली. 30 ते 32 फूटावरून तिने उडी मारल्याने तिच्या डोक्याला मार गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. (pooja chavan grandmother’s reaction on suicide case)
संबंधित बातम्या:
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी कायदेशीर अडचणींमुळे गुन्हा नोंद नाही: पुणे पोलीस
मंत्र्याला हाकला, घरी पाठवा; चौकशी होत राहील; पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी निलेश राणे आक्रमक
(pooja chavan grandmother’s reaction on suicide case)