महाराष्ट्र केडरची प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आल्यानंतर त्यांच्यावर विविध आरोप झाले आहेत. आता वादात सापडल्यानंतर त्यांची महाराष्ट्रातील प्रशिक्षण रोखण्यात आलं आहे. उत्तराखंडमधील मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने पूजा खेडकर यांचा महाराष्ट्रातून होणारा प्रशिक्षण कार्यक्रम रद्द केला आहे. अकादमीने त्यांना तातडीने माघारी बोलवले आहे. प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांनी अपंगत्व प्रमाणपत्रासाठी वेगवेगळ्या पत्त्यांवर आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये अर्ज केला होता. पूजा खेडकर यांनी नोकरी मिळवण्यासाठी दिव्यांग कोट्याचा लाभ घेतला आहे. पण महत्त्वाचे म्हणजे त्यांना सहा वेळा वैदकीय पडताळणीसाठी बोलवण्यात आले असून सुद्धा त्या हजर झाल्या नाहीत. आता पूजा खेडकर यांच्या नोकरीच्या प्रकरणाची केंद्र सरकारने चौकशी सुरु केली आहे. समितीला दोन आठवड्यात अहवाल सादर करायचा आहे.
पूजा खेडकर यांचे आई आणि वडील यांच्याबाबत ही वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. वडिलांकडे करोडोंची संपत्ती असून सुद्धा पूजा खेडकर यांनी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढून त्याचा लाभ घेतला आहे. तर त्यांची आई यांचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये त्या समोरच्या व्यक्तींना धमकावताना दिसत आहेत.
पूजा खेडकर यांना दृष्टिहीन आणि मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र सादर करून यूपीएससी परीक्षा दिली होती. त्यांनी यासाठी या कोट्यातून विशेष सवलती मिळवली आणि आयएएस झाल्या. जर त्यांनी सवलत मिळाली नसती तर त्यांना मिळालेल्या गुणांनुसार त्यांना ही आयएएसची नोकरी मिळाली नसती. त्यांची निवड झाल्यानंतर पूजा खेडकर यांना वैद्यकीय तपासणी करावी लागणार होती. मात्र त्यांनी ती पुढे ढकलली. विविध कारणं देऊन त्यांनी सहा वेळा ही वैद्यकीय तपासणी नाकारली. त्यांनी बाह्य वैद्यकीय एजन्सीकडून एमआरआय अहवाल सादर केला होता. सुरुवातीला तो UPSC ने स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र नंतर तो यूपीएससीने स्वीकारला होता. यामुळे शासनाकडे याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
यूपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखतीतनंतर वैद्यकीय पडताळणी केली जाते. पास होऊन अधिकारी झाल्यानंतर ही त्यांना २ वर्षाच्या आत वैद्यकीय पडताळणी करणे अनिवार्य असते. पोस्टिंग झाली तरी उमेदवार हा २ वर्षाच्या प्रोबेशन पीरेडवर असतो. त्यामुळे या काळात त्याची नोकरी जाऊ शकते.
आता जर पूजा खेडकर यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे किंवा खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे ही नोकरी मिळाली असेल किंवा वैद्यकीय पडताळणी दरम्यान त्या दिव्यांग असल्याचं सिद्ध झाले नाही तर त्यांना ही नोकरी गमवावी लागू शकते. त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.