राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याचं स्पष्ट दिसत आहे. गेल्या दीड वर्षांपासून ही फूट पडलेली आहे. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय रणनीतीचा भाग म्हणून पक्षफुट सारखी घटना घडवून आणली का? अशी शंका सर्वसामान्यांकडून उपस्थित केली जात होती. पण केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात जसजशी दोन्ही गटांमधील लढाई तीव्र होत गेली तसतशी पक्षात उभी फूट पडल्याचं चित्र स्पष्ट होत गेलं. लोकसभा निवडणुकीच्यावेळी तर पवार कुटुंबातही वितुष्ट आल्याचं बघायला मिळालं. कारण खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी लढत बारामतीत बघायला मिळाली. यानंतर आता शरद पवार गटाकडून त्यांचे नातू युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. तर या मतदारसंघात खुद्द अजित पवार हे उमेदवार आहेत. त्यामुळे दोन्ही गटात टोकाचं राजकारण सुरु असल्याचं बघायला मिळत आहे.
निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह हे अजित पवारांना मिळालं. तर शरद पवार गटाला नवं नाव आणि तुतारी चिन्ह मिळालं. दुसरीकडे सर्वसामान्य मतदारांमध्ये संभ्रम व्हायला नको म्हणत शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात अजित पवार गटाला विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्ह वापरता येऊ नये, अशी मागणी शरद पवार गटाने सु्प्रीम कोर्टात केली होती. पण सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाची ती मागणी फेटाळली आहे. तसेच अजित पवार गटाला काही गोष्टींवरुन सुनावत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. असं असताना घड्याळ चिन्हावरुन राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. अखेर याबाबतच्या प्रश्नावर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
“सुप्रीम कोर्टाने घड्याळ चिन्हाविषयी कुठलीही स्थगिती दिलेली नाही. फक्त ते न्यायप्रविष्ठ आहे. अजूनही अंतिम फैसला कधी येईल हे काही सांगता येत नाही. विधानसभेची निवडणूक आहे. ही निवडणूक घड्याळाच्या चिन्हावरच लढवली जाईल. ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये आम्ही लढलो तशीच निवडणूक लढवली जाईल. आता फक्त जे काही न्यायप्रविष्ठ विषय आहे ते त्यांच्याबद्दल वारंवार हे आमचे समोरचे लोक कोर्टात जातात कोर्टाने काही आमच्याकडून प्रतिज्ञापत्र मागितले आहेत. आम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करत आहोत. तसेच तशी अपील आम्ही कोर्टामध्ये करणार आहोत”, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
दरम्यान, शरद पवार हे आता तरुणांना संधी देत असल्याने नवं नेतृत्व निर्माण करत असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नावरही प्रफुल्ल पटेल यांनी उत्तर दिलं. “प्रत्येक पक्षामध्ये नवीन नेतृत्व तयार करावंच लागतं. आणि चांगली गोष्ट आहे पवार साहेब आमचे आदरणीय आहेत. त्यांच्याबरोबर मी जवळपास पस्तीस वर्षे काम केलं आहे. काही विषयच नाही, त्यांनी अनेक नवीन लोकांना घडवण्याचं काम केलेलं आहे. आणि यापुढेही करत राहणार आणि मला अशी खात्री आहे”, असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.