औरंगजेबाने जेवढे लोक मारले, तेवढेच लोक राज्य सरकारच्या… बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया काय?

| Updated on: Mar 21, 2025 | 8:03 PM

दिव्यांग मंत्रालय निर्माण करण्यात येऊन १४०० कोटींची तरतूद करण्यात आली. मात्र, त्यापैकी १२०० कोटी रुपये केवळ पगारावर खर्च केले जात आहे. मुबलक निधी नसेल, तर दिव्यांग मंत्रालय कशाप्रकारे काम करणार हे सरकारने स्पष्ट करावे. श्रम, मूल्य आधारित मोबदला लोकांना मिळत नसून, केवळ राजकीय लाभासाठीच्या योजना सध्या सुरू आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले.

औरंगजेबाने जेवढे लोक मारले, तेवढेच लोक राज्य सरकारच्या... बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया काय?
Bacchu kadu
Follow us on

तत्कालीन शिंदे सरकारसोबत असलेले प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. औरंगजेबानेच्या काळात जेवढे लोक मारले नसतील, त्यापेक्षा अधिक लाखो शेतकऱ्यांनी राज्यात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या केल्या आहेत. औरंगजेबाने तलवारीच्या टोकावर लोकांना मारले. मात्र सध्याचे राज्यकर्ते हे त्यांच्या धोरणामुळे लोकांना मारत आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर केली. सरकारने धर्म, जात यावर राजकारण करण्यापेक्षा नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.

प्रहार संघटनेच्या वतीने दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी तीन दिवस अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले, “आज देशात आणि राज्यात धर्म आणि जातीपातीचे घाणेरडे राजकारण केले जात आहे. सरकारला नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक धर्माच्या लोकांना पोट असते आणि त्याकरिता सरकारने प्रयत्न केले पाहिजेत.

दिव्यांगांचे मानधन रखडले

बच्चू कडू पुढे म्हणाले, “सर्वत्र महागाई वाढलेली असून दिव्यांगांना मागील चार महिन्यांपासून कोणतेही मानधन मिळत नाही. त्यांचे जीवन असह्य झाले आहे. याबाबत सरकार कोणतीही दखल घेताना दिसत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा शेतीच्या शेतमालास योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झालेला आहे. लाडकी बहीण योजना नाममात्र आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी, मजूर, दिव्यांग, कामगार यांच्यासाठी कोणतीही विशेष तरतूद न करता केवळ अनुदान कपातीचे धोरण आखले जात आहे.”

हे सुद्धा वाचा

राजकीय लाभासाठी योजना

दिव्यांग मंत्रालय निर्माण करण्यात येऊन १४०० कोटींची तरतूद करण्यात आली. मात्र, त्यापैकी १२०० कोटी रुपये केवळ पगारावर खर्च केले जात आहे. मुबलक निधी नसेल, तर दिव्यांग मंत्रालय कशाप्रकारे काम करणार हे सरकारने स्पष्ट करावे. श्रम, मूल्य आधारित मोबदला लोकांना मिळत नसून, केवळ राजकीय लाभासाठीच्या योजना सध्या सुरू आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले.

औरंगजेबाची कबर, दिशा सॅलियन प्रकरणातून नेमका कोणाचा फायदा होणार? असा प्रश्न उपस्थित करत बच्चू कडू पुढे म्हणाले, निरर्थक गोष्टी दाखवण्यापेक्षा योग्य गोष्टी दाखवल्या तर लोकांना समाधान मिळेल. औरंगजेबाच्या कबरीबाबत राजकारण प्रसारमाध्यमातून दाखवले जाते, पण सामन्यांचे हाल कोणाला दिसत नाही. राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात दंगल होते. याबाबत कोणतीही खंत व्यक्त न करता ते राजकारण करत असल्याचे पाहावयास मिळते, असा आरोप बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.