मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा फोटो घरात लावा, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी समाजाला केलं आहे. ओबीसी संघटनांना जागृत करण्यात मनोज जरांगे यांचं योगदान आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. “मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानतो. जे आम्ही 40 वर्षात करू शकलो नाही ते त्यांनी 2 वर्षात करून दाखविले. ओबीसींच्या विविध संघटनांमध्ये चैतन्य निर्माण केलं. आपण आपल्या अधिकारासाठी लढलं पाहिजे, याची जाणीव करून दिली. सगळ्यांनी जरांगेंचा फोटो घरात लावा आणि विधानसभा निवडणूक होत नाही तोवर त्याला एक हार लावा म्हणजे आपल्या लक्षात राहिल की आपल्याला ओबीसींसाठी लढायचं आहे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“आता मनोज जरांगेंच्या निमित्ताने मराठ्यांमधील एक वर्ग गरीब मराठा चॅलेंज करतोय. जरांगेंना डोकं कोणी दिलं ते माहिती नाही. पण त्याला सलाम करतो. एक तीर मे दो निशाणा. एक निशाणा ओबीसीला आणि त्या 169 मराठा आमदारांच्या कुटुंबांना लागला. त्यांना जर भीती वाटायला लागली की, जरांगे असाच करत राहिला तर सत्तेच सार्वत्रिकीकरण करेल. सत्ता महाराष्ट्रामध्ये 169 कुटुंबामध्ये अडकली आहे. तर जरांगे यांनी अख्खा गरीब मराठा उठविला आणि श्रीमंत मराठावर सोडला”, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
“ओबीसींना चॅलेंज दिलं की मी तुमचं आरक्षण मागतोय. जरांगेंची भूमिका चित भी मेरी पट भी मेरी. गावरान राजकारण करतो, इंग्लिश राजकारण करत नाही. जोवर ओबीसींची टक्केवारी कळत नाही तोवर ओबीसी आरक्षणाला हे स्टे देतात. आकडेवारी नाही म्हणून सभागृहात स्थगिती दिली जाणार. ही पद्धत जिल्हा परिषद महापालिकामध्ये सुप्रीम कोर्टाने अवलंबली. ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाल्यावर जरांगेंच्या हातातील हत्यार काढून घेतले जाणार. त्यामुळे याच निवडणुकीत ओबीसींनी ओबीसी उमेदवारला मतदान केलं पाहिजे. जेणेकरून 100 आमदार ओबीसी समाजाचे विधानसभेमध्ये असतील”, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं.