अखेर महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालं आहे. त्यानुसार ठाकरे गट सर्वाधिक 21 जागा लढवणार आहे. तर काँग्रेस 17 आणि शरद पवार गट 10 जागा लढवणार आहेत. या जागा वाटपात समाजवादी पार्टी, माकप, शेकाप आणि इतर मित्र पक्षांना एकही जागा देण्यात आलेली नाही. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही मतदारसंघात महाविकास आघाडी पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचं दिसून येत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीची साथ सोडली. त्यापूर्वी त्यांनी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा दिला. तर शरद पवार गटाला बारामतीत पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात महाविकास आघाडी अकोल्यातून उमेदवार देणार नाही अशी चर्चा होती. परंतु काँग्रेसने अकोल्यातून उमेदवार दिला. त्यानंतर शरद पवार यांनी अजून वेळ गेलेली नाही. त्याबाबत चर्चा होईल, असं सूचक विधान केलं होतं. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यात पाठिंबा देण्यासाठी शरद पवार काँग्रेसचं मन वळवतील असं सांगितलं जात होतं. पण आज झालेल्या जागा वाटपात काँग्रेसने अकोल्यात आपला उमेदवार कायम ठेवला आहे. त्यामुळे अकोल्यात महाविकास आघाडी आंबेडकरांना टक्कर देणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांना प्रकाश आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत विचारण्यात आलं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सविस्तर उत्तर दिलं. प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न होता. संविधान वाचवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो होतो. पण काही गोष्टी पुढे गेल्या नाहीत. त्यामुळे आमची त्यांच्यासोबत आघाडी होऊ शकली नाही. पण पुढच्यावेळी आम्ही एकत्र येण्याचा नक्की प्रयत्न करू. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात आम्हीही काहीही बोलणार नाही हे मी मागेच सांगितलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या तहात शरद पवार यांचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेच्या फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांनी आघाडीत 21 जागा मिळवल्या आहेत. तर राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडाल्यानंतरही शरद पवार यांनी 10 जागा मिळवण्यात यश मिळवलं आहे. काँग्रेसला मात्र, केवळ 17 जागांवर निवडणुका लढवाव्या लागणार आहेत. त्यामुळे या जागा वाटपात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सरशी केल्याची जोरदार चर्चा आहे.
काँग्रेस (17)
नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि मुंबई उत्तर.
राष्ट्रवादी (10)
बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड.
शिवसेना (21)
जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजी नगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशीम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण आणि मुंबई ईशान्य.