’10 हजार घ्या आणि वंचितला मतदान करा’, प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Sep 30, 2024 | 10:53 PM

"सध्या राजकारणाची परिस्थिती काय तर एखाद्याला उमेदवारी द्यायची असेल तर पैशांची बोली बोलून उमेदवारी मिळते. दोन हजार रुपयात मतदान करू नका. दहा हजार रुपये घ्या आणि मतदान वंचितला करा", असं प्रकाश आंबेडकर उपरोधिकपणे म्हणाले. जळगावच्या चोपडा येथील कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर बोलत होते.

10 हजार घ्या आणि वंचितला मतदान करा, प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
prakash ambedkar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

“आदिवासी लोकांना राजकारणी न्याय देत नाही. मात्र यावेळेस आदिवासी बांधव निवडणुकीत उतरतील. महाराष्ट्रातील राजनीती ही पैशांची राजनीती झालीय. लोकसभा निवडणूक झाली. यात पैसे वाटले गेले. दोन हजार रुपये प्रमाणे वाटले गेले. सध्या राजकारणाची परिस्थिती काय तर एखाद्याला उमेदवारी द्यायची असेल तर पैशांची बोली बोलून उमेदवारी मिळते. दोन हजार रुपयात मतदान करू नका. पैसे देणाऱ्यांकडून दहा हजार रुपये घ्या आणि मतदान वंचितला करा”, असं प्रकाश आंबेडकर उपरोधिकपणे म्हणाले. जळगावच्या चोपडा येथील कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर बोलत होते.

“आदिवासींना साडेसात टक्के पेक्षा साडेतीन टक्केच आरक्षण मिळत आहे. लोकांनी संविधान बदलू दिले नाही तर आता आरक्षण बदलण्याचे काम सुरू आहे. संविधानामधील गाभा काढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. शरद पवारांचे एक विधान होतं. शरद पवार सर्वांचे नेते राहिलेले नाहीत. शरद पवार हे मराठा समाजाचे नेते झाले. रत्नागिरीच्या सभेत सांगितलं की, जरांगे तुमच्या आंदोलनाला शरद पवारांनी पाठिंबा दिला आहे. ओबीसीतून आरक्षण द्या असं वक्तव्य करतात”, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

‘…तर ओबीसींचं आरक्षण चाललं जाईल’

“मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं तर ओबीसींचं आरक्षण चाललं जाईल. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही आरक्षण बचाव यात्रा काढली. जरांगे पाटील यांचं आरक्षणाबाबत आंदोलन थांबलेलं नाही. ओबीसींचेही आरक्षण आंदोलन थांबणार नाही आणि विधानसभेनंतर हे आंदोलन पुन्हा सुरू होईल. ओबीसींचं आरक्षण हे वंचितच्याशिवाय वाचू शकत नाही”, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

“लोकसभेत काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांनी एक तरी उमेदवार ओबीसीचा दिला का? या विधानसभेतही ओबीसीला उमेदवारी कुठेही मिळणार नाही. ओबीसींची उमेदवारी ओबीसीला मिळाली नाही तर यावेळी ओबीसींचा आमदार राहणार नाही”, असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

‘आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्यांना मतदान द्यायचं नाही’

“शरद पवार म्हणतात मराठा समाजाचे आम्ही 200 उमेदवार निवडून आणणार. कशासाठी निवडून आणतील? तर डेटा नाही. जनगणना केली जाईल. भारतीय जनता पार्टीने सुप्रीम कोर्टात लिहून दिलं आहे की, आम्ही जातीय जनगणना करणार नाही. काँग्रेसवाले म्हणतात की, आम्ही जनगणना करू. काँग्रेस सुद्धा जातगणनेच्या विरोधात आहे. ओबीच्या मतदानावर निवडून येणार आहेत. निवडणुकीच्या अगोदर धोका नाही. त्यामुळे आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्यांना मतदान द्यायचं नाही”, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

“भारतीय जनता पार्टी हे मध्यंतरी हिंदू-मुस्लिमच्या दंगली घडवण्याचं काम करत होती. आताही धार्मिक राजकारण सुरू केलं आहे. मुस्लिम जसे म्हणतात इस्लाम खतरे मे हैं, तसे आता आरएसएस आणि बजरंग दल, बीजेपीवाले म्हणतात की हिंदू खत्रे मे हैं. ओबीसी हा हिंदू नाही का?”, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.