मोदींचा 11 दिवस उपवास, प्रकाश आंबेडकर यांचा टोला; म्हणाले, उपवासाच्या थिअरीत…

| Updated on: Jan 24, 2024 | 8:58 PM

अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 11 दिवसांचा उपवास केला. याच मुद्द्यावरुन प्रकाश आंबेडकर यांनी मोदींना टोला लगावला. प्रकाश आंबेडकर आज ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

मोदींचा 11 दिवस उपवास, प्रकाश आंबेडकर यांचा टोला; म्हणाले, उपवासाच्या थिअरीत...
Follow us on

धाराशिव | 24 जानेवारी 2024 : धाराशिवमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील उपस्थिती लावली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. “कुणी तरी देवाची पूजा केली, ११ दिवस उपवास केला म्हणून तो फार चांगला माणूस झाला अजिबात नाही. ११ दिवस उपवास केला म्हणून फार मोठं पूण्य केलं असं अजिबात नाही. या थिअरीमध्ये फसू नका”, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात केलं. अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी 11 दिवसांचा उपवास केला. याच मुद्द्यावरुन प्रकाश आंबेडकर यांनी मोदींना टोला लगावला.

“जुन्या काळी सत्ता देवळातून चालत होती. पूजाऱ्याकडून चालत होती. आधुनिक काळात २१व्या शतकात सत्तेचं केंद्र बदललं. आता सत्तेचं केंद्र पार्लमेंट आहे. सत्तेचं केंद्र विधानसभा आहे. आपण पाहात असाल शिवाजी महाराजांचंही राज्य स्थापन झालं. फार मोठा इलाखा त्यांनी आपल्या कब्जा खाली केला. पण त्या कालावधीत जोपर्यंत राजाचा मानसन्मान धर्माने केला नाही, राज्याभिषेक… तो जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत तो राजा अधिकृत समजला जात नव्हता. म्हणजे. शिवाजी महाराज सत्तेत होते. राजे होते. पण मान्यता धर्मसंसदेची लागायची. धर्म संसद जोपर्यंत मान्यता देत नाही तोपर्यंत राजे म्हणून अधिकृत मान्यता मिळत नसायची. त्यामुळे त्यांनी गागाभट्टांना बोलावून त्यांनी अभिषेक करून घेतला”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

‘आताच्या काळात सत्तेचं केंद्र भटजीकडे’

“आताच्या काळात सत्तेचं केंद्र बदललं. आता भटजीकडे केंद्र राहिलं नाही. ते केंद्र आता निवडून आलेला आमदार आणि खासदार यांनी घेतलं. हे लक्षात घ्या. ओबीसींना आरक्षण मिळालेलं आहे. हे आरक्षण राहिलं पाहिजे, त्यातून ओबीसींचा उद्धार झाला पाहिजे, असं आधीचे वक्ते म्हणाले. वस्तुस्थितीला धरून आहे. नाही असं नाही. हे आरक्षण आपण वाचवणार कसं? हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. नुसतं वाचवायचं नाही तर आरक्षणातून लोकांचा विकास झाला पाहिजे हेही पाहिलं पाहिजे. विकास साधायचा असेल आणि आमदार, खासदार व्हायचं असेल तर सर्व प्रथम उमेदवारी मिळाली पाहिजे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“उमेदवारी मिळाली की तर आपण निवडणुकीला उभे राहतो. निवडणुकीला उभं राहून जिंकलो तर आमदार किंवा खासदार होतो. इथेच सर्वात मोठी गमक आहे. मी आज नाही, ९० सालापासून सांगत आलोय की, महाराष्ट्राची सत्ता ही १५९ कुटुंबात अडकलेली आहे. मग ती डीसीसी बँकेचा चेअरमन असेल, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल, बाजार समितीचा चेअरमन असेल, पतसंस्था असतील किंवा आमदार किंवा खासदार असतील. इथलेच खासदार आणि आमदार घ्या. नात्यागोत्यातच त्यांचे संबंध आहेत. म्हणून ही सत्ता १५९ कुटुंबात अडकली आहे. त्यामुळे ही अडकलेली सत्ता सोडवून सर्व सामान्यांपर्यंत न्यायची आहे”, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.

आंबेडकरांचा मोदींना टोला

“हे करायचं असेल तर कुणी तरी देवाची पूजा केली, ११ दिवस उपवास केला म्हणून तो फार चांगला माणूस झाला अजिबात नाही. तुम्हीही १५ दिवस उपवास केला तर मरणार नाही हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर मराल. त्यामुळे ११ दिवस उपवास केला म्हणून फार मोठं पूण्य केलं असं अजिबात नाही. या थिअरीमध्ये फसू नका”, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी मोदींना टोला लगावला.

“जे मिळालेलं आहे ते निघून जाईल हे लक्षात घ्या. आपल्याला उद्याचं आरक्षण वाचवायचं असेल तर आरक्षणवादी राजकीय पक्ष एका बाजूला झाले पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आरक्षणवाद्यांनी त्यांना उमेदवारी दिली पाहिजे. राजकीय पक्षांचे दोन गुण पाहिजे, एक तर तो आरक्षणवादी असला पाहिजे आणि दुसरं आरक्षणावादी कृतीला त्याने आकार आणि स्वरुप देण्यासाठी उमेदवारी दिली पाहिजे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.