वंचित आघाडीच्या लोकांनी मला स्वीकारले नाही. अनेक लोकांनी निवडणुकीत माझे काम देखील केले नाही. लोकसभा निवडणुकीत सर्वांनी काम केले असते तर लोकसभेच्या निवडणुकीचे चित्र वेगळे असते. प्रकाश आंबेडकर यांना अपेक्षित असा पक्ष ते उभा करू शकले नाहीत, असा हल्ला पुण्यातील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते वसंत मोरे यांनी शुक्रवारी केला. त्यांच्या जोरदार पलटवार प्रकाश आंबडेकर यांनी केले. वसंत मोरे यांच्या बाबत आयाराम गयारमचे राजकारण बघायला मिळत आहे. त्यांना माणसे ओळखता येत नाही. त्यांच्याकडून सातत्याने अशा गोष्टी घडतात, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.
वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे सोडली होती. त्यानंतर ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत होते. परंतु लोकसभेचे तिकीट मिळणार नसल्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडीची वाट धरली. वंचितकडून लढताना त्यांना प्रभाव दाखवता आला नाही. यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या उबाठामध्ये सहभागी होत आहे. ९ जुलै रोजी त्यांच्या ठाकरे सेनेत प्रवेश होणार आहे. यामुळे वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी वसंत मोरे यांची कार्यालय फोडण्याची धमकी दिली. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबडेकर यांनी मौन सोडले.
लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे फोटो आहेत. याबाबत मी एक पोस्ट बघितली आहे. राज्यातील महिलांना सरकार महिन्याला दीड हजार रुपये देणार आहे. याबद्दल आम्ही आभारी आहोत. पण गॅसचे भाव कमी होणार आहेत का? राशन पुरणार आहात का? माझ्या बहिणींची फी भरली जाणार आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. मला दीड हजार देण्यापेक्षा शासनाने ते परत घेऊन मला चांगले आयुष्य जगता येईल, या पद्धतीने महागाईवर नियंत्रण ठेवा, अशी विनंती अनेक भगिनींनी केली आहे. लोकांची अशी भावना आहे की, अनुदान देण्यापेक्षा किमंती वरती नियंत्रित करा. आमचा आयुष्य आमच्या पैशावर जगू द्या. राजकारणांनी त्यातून बोध घ्यावा, असे मला वाटते.
नागपूरच्या दीक्षाभूमीवर आंदोलन झाले. त्याबाबत अनेक केसेस दाखल झालेल्या आहेत. त्या लोकांना अटक होण्याची परिस्थिती आहे. या प्रकरणात आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात कोणाला अटक होणार नाही? असे सांगितल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.