जळगाव : 24 सप्टेंबर 2023 | भाजपसोबत गेलेले मंत्री, आमदार यांना ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे बंद झालेत.’ असा इशारा शरद पवार यांनी दिला. त्यावरून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी ‘त्यांनी कधी सांगितलं तुम्हाला दरवाजे उघडा असं? आता उलट तुम्ही तुमचे दरवाजे बंद करा. कारण, तुमच्याकडचे जे दोन चार पाच लोक शिल्लक आहे तेही आता अजितदादा यांच्याकडे यायला लागली आहेत, असा टोला शरद पवार यांना लगावला. शरद पवार यांनी अदानी यांची भेट घेतली. पण, त्यांच्यावर आता काँग्रेसचे नेते असतील किंवा इतर नेते असतील टीका करायला लागले आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचं काय ते एकमत करावे, अशी टीकाही त्यांनी केली.
इंडिया आघाडीचा नेता कोण ते अजून ठरले नाही. त्यांच्या नेता ठरला की चारी बाजूने घोडे पळतात तसे हे सर्व पळत सुटतील, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली. इंडिया आघाडीमध्ये एकमत आहे का? असा सवाल करून ते म्हणाले, थोडा वेळ पुढे चालणारी ही सर्कस आहे. त्यांच्यापैकी कुणाचीही आयडी नाही किंवा त्यांच्यात एकमत नाही. त्यामुळे 2024 मध्ये सुद्धा सर्वाधिक खासदार हे भाजपचे निवडून येतील आणि मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. काही दिवसांनी भाजपा महाशक्ती विश्वगुरू सुपर पॉवर होणार आहे, असे महाजन म्हणाले.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याचा दौरा करणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा जो हेतू आहे त्यानुसार काम करावे. सरकारने आता शिंदे आयोग नेमला आहे, त्यांचे दररोज काम सुरू आहे. बैठक होत आहे. जरांगे पाटील यांना त्या बैठकीला आमंत्रित करण्यात आले आहे. लवकर यावर सन्मानजनक तोडगा निघेल, असे महाजन यांनी सांगितले.
नव्या संसद भवनावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. त्याला प्रतुत्तर देताना मंत्री महाजन म्हणाले, संजय राऊत यांचे डोकं तपासला पाहिजे. कुठे संजय राऊत. कुठे मोदीजी आणि कुठे संसद भवन. जगातली सर्वात मोठी वास्तू म्हणजे संसद भवन आहे. मात्र, संजय राऊत यांचे प्रश्न मूर्खपणाचे आहेत.
संजय राऊत यांच्याकडून दुसरी काही अपेक्षा नाही. चंद्रावर गेले तरी चंद्रावर का गेले? सूर्यावर का गेले नाहीत असे त्यांचे मूर्खपणाचे प्रश्न असतात. संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही, आम्ही त्यांना फार गांभीर्याने घेत नाही, अशी टीका त्यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून डावलल जात आहे अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली. त्यावर एकनाथ खडसे यांनी आमची काळजी करू नये. त्यांचे राष्ट्रवादीमध्ये जे काही बचे कूचे लोक आहेत ते सुद्धा आता आमच्याकडे येत आहे. तुम्ही शरद पवार यांना घट्ट पकडून रहा. इकडे परत येण्यासाठी पुन्हा काकुळत्या करू नका, हात पाय जोडू नका. अजितदादा यांच्याबरोबर येण्यासाठी तुम्ही काय करत आहेत याची आम्हाला तसेच अजित पवार यांना सुद्धा कल्पना आहे, असा टोला महाजन यांनी लगावला.