tara bhawalkar: दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी ही माहिती दिली. यंदा संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. तारा भवाळकर यांच्यासह प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे, सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांची नावे चर्चेत होती.
तारा भवाळकर यांचा लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांचा गाढ्या अभ्यास आहे. त्यांनी लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललितलेखन, लोककला आणि लोकसाहित्य या विषयावर पुष्कळ संशोधन आणि विपूल लेखन केले आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासात हा बहुमान संपादन करणाऱ्या भवाळकर या सातव्या महिला ठरल्या आहेत.
संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या स्थापनेनंतर देशाच्या राजधानीत प्रथमच साहित्य संमेलन होत आहे. त्या संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी पुण्यात दोन दिवस बैठक झाली. या बैठकीत अनेक नावांवर चर्चा झाली. शेवटी डॉ. तारा भवाळकर आणि विश्वास पाटील यांचे नाव अखेरपर्यंत कायम राहिले. त्यानंतर भवाळकर यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
यंदा सरहद संस्थेला दिल्लीत संमेलन घेण्याचा मान मिळाला आहे. यापूर्वी पाच वर्षांपूर्वीसुद्धा दिल्लीत संमेलन घेण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. परंतु दिल्लीत संमेलन होऊ शकले नाही. यापूर्वी दिल्लीत १९५४ मध्ये संमेलन घेण्यात आले होते. त्यावेळी संमेलनाचे अध्यक्षपदी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते. त्याच्या ७० वर्षांनी दिल्लीत संमेलन होत आहे. त्याचे अध्यक्षपद तारा भवाळकर यांना मिळाले आहे. येत्या फेब्रुवारीमध्ये ९८ वे साहित्य संमेलन होणार आहे.
१ एप्रिल १९३९ या दिवशी तारा भवाळकर यांचा जन्म झाला. आता वयाच्या ८५ व्या वर्षीही त्या सक्रीय आहेत. १९५८ ते १९७० या काळात त्यांनी माध्यमिक शिक्षिका म्हणून काम केले. १९७० ते १९९९ दरम्यान त्या सांगलीच्या श्रीमती चंपाबेन वालचंद शहा महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवले आहे. त्यांनी पौराणिक नाटक, लोकनाट्य, दशावतार, तंजावरची नाटके, यक्षगान, कथकली अशानाट्य प्रकारांची जडणघडण शोधली.