लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु झाला. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराची पातळी पुन्हा खालवत आहे. बुलढाणा येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केले. सभेत बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेब यांच्याशी केली. सभेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, मोदी नाही, औरंगजेब म्हणा. औरंगजेब याचा जन्म हा नरेंद्र मोदी यांच्या गावाजवळ झाला आहे. त्यामुळे दोघांचीही विचारसरणी सारखी आहे. शिवसेना उबाठाच्या या टीकेची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली होती. त्यांनी प्रचारसभेत त्याचे उत्तर दिले होते. मला १०४ शिव्या आत्तापर्यंत दिल्या गेल्या आहेत. त्यात आता औरंगजेब ही भर पडली, असा टोला नरेंद्र मोदी यांनी शिवसेना उबाठाला लगावला होता. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना डिवचणारे ट्विट केले आहे. उद्धव ठाकरे औरंगजेबच्या मांडीवरवर बसलेले असून संजय राऊत पाय चेपत असल्याचा ट्विट केले आहे.
शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाला डिवचणारे ट्विट X वर करण्यात आले आहे. त्या ट्विटमध्ये कार्टून दिले आहे. त्यात औरंगजेब दाखवला असून त्याच्या मांडीवर उद्धव ठाकरे बसलेले दिसत आहे. तसेच संजय राऊत पाय चेपत आहे. ‘शुक्रिया बच्चो, तुमने मुझे फिर जिंदा कर दिया’, असे कॅप्शन या पोस्टला दिले आहे. तासाभरातच ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.
शुक्रिया बच्चो, तुमने मुझे फिर जिंदा कर दिया pic.twitter.com/fcXckFoG7y
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) March 22, 2024
उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जोरदार उत्तर दिले आहे. त्यांनी भाषणात म्हटले की, उबाठाला मोदी द्वेषाने पछाडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले. कलम ३७० रद्द केले. बाळासाहेबांचे स्वप्न साकार करणाऱ्यांना तुम्ही औरंगजेब म्हणतात. पण याकुब मेननच्या कबरीचं उदात्तीकरण करणारे कोण ? औरंगजेबाने वडिलांना सोडलं नाही. भावाला सोडलं नाही, अशी वृत्ती असणारा औरंगजेब कोण आहे? हे सगळ्यांना माहिती आहे.