चंदन पुजाधिकारी, नाशिक: राज्य सरकारने खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना उपचारांसाठी दरपत्रक निश्चित केल्यानंतर आता नाशिकमधील परिस्थिती चिघळण्याच्या मार्गावर आहे. याठिकाणी खासगी डॉक्टरांच्या संघटनेने (Doctors) आम्ही याबाबत पालिका आयुक्तांशी चर्चा झाल्याशिवाय नवे रुग्ण दाखल करुनच घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. आता बुधवारी संध्याकाळी आयुक्त कैलाश जाधव आणि डॉक्टरांच्या संघटनेची चर्चा होणार आहे. या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार, याकडे नाशिककरांच्या नजरा लागल्या आहेत. (Private hospitals in Nashik is not ready to treat coronavirus patients)
यासंदर्भात डॉक्टरांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्हाला काही काळ विश्रांती मिळावी म्हणून आम्ही ही भूमिका घेतली आहे. आमच्यापुढेही काही प्रश्न आहेत. त्यावर चर्चा झाली पाहिजे, असा पवित्रा डॉक्टरांच्या संघटनेने घेतला आहे.
रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांवर कुठलेही दडपण नको. डॉक्टरांना सुरक्षा पुरवण्यात आली पाहिजे. औषधं आणि ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत नियोजन करणे हे प्रशासनाचे काम आहे. आमचे काम फक्त रुग्णांवर उपचार करण्यापुरता मर्यादित असल्याचे हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे प्रमुख डॉ. राज नगरकर यांनी सांगितले.
कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्याने आता सरकारी रुग्णालयांमध्ये त्यांचे उपचार होऊ शकतात. आम्ही आता थकलेलो आहोत. त्यामुळे आम्ही सेवा बंद करतो, असे म्हटले होते. रुग्ण वाढल्यास आम्ही सेवा पूर्ववत करु. आम्हाला दरपत्रक निश्चित केल्यामुळे कोणतीही अडचण नाही, असे डॉ. राज नगरकर यांनी सांगितले.
रुग्णालयांकडून अवाजवी पैसे आकारले जात असतील तर आम्ही त्याचे समर्थन करत नाही. नातेवाईकांना आक्षेप असतील तर त्यांनी ऑडिट करावे, असेही डॉ. नगरकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी सुरज मांढरेंनी शहरातील खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांच्या उपचाराबाबत घेतलेल्या निर्णयाविषयी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रत्येक हॉस्पिटल मधल्या 80 टक्के जागा अधिग्रहित केल्या आहेत, हे नियम सर्वांसाठी बंधनकारक आहे. रुग्णालयांनी त्यांना येणाऱ्या अडचणी मांडाव्यात, पण असंविधानिक भूमिका घेऊ नये, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना पब्लिक कडून येणार प्रेशर हे डॉक्टरांनी मुख्य कारण दिलं होतं.
शहरातील खासगी रुग्णालयात 2 जून पासून कोरोना रुग्ण दाखल करुन घेण्यात येणार नाही, असं पत्र खासगी रुग्णालयांनी काढलं होतं. नाशिकमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं. खासगी डॉक्टरांनी पत्र काढून निर्णयाची माहिती दिली आहे.
संबंधित बातम्या:
(Private hospitals in Nashik is not ready to treat coronavirus patients)