पुणे येथे सिटी बसमध्ये एका महिलेची छेडछाड करणाऱ्या व्यक्तीला महिलेने चांगलाच धडा शिकवला. महिलेने छेडछाड करणाऱ्या व्यक्तीला मारतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर महिलेच्या धाडसाचं मोठ कौतुक होत आहे. प्रिया लष्करे असं या रणरागीनीच नाव आहे. त्यांचं सासर पुणे येथील तर माहेर नाशिक येथील आहे. सध्या प्रिया लष्करे या कोपरगाव तालुक्यातील खाजगी शाळेत शिक्षेका म्हणून नोकरी करतात. या घटनेची सविस्तर माहिती प्रिया लष्करे आणि त्यांचे पती राहुल लष्करे यांनी ‘टिव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली. कोणी वाईट कृत्य करत असेल, छेड काढत असेल, त्याचा प्रतिकार केलाच पाहिजे. समाजाने देखील अशा घटना घडत असताना सोबत उभे राहावे, असं आवाहन प्रिया लष्करे यांनी केलंय.
“ही घटना 17 डिसेंबरची आहे. मी माझे पती आणि लहान मुलगा असे आम्ही तिघेजण पुण्यात बसमध्ये चढलो. माझ्या पतींना बसमध्ये बसायला जागा नव्हती. ते पुढे जाऊन बसले. मी आणि माझा मुलगा त्या व्यक्तीच्या जवळ बसलो होतो. नंतर थोड्या वेळाने माझा मुलगा पुढे जाऊन बसला. तो व्यक्ती दारु पिलेला होता. ही गोष्ट माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्याला तिकडे सरका वगैरे असं काही जास्त बोलले नाही. पण जेव्हा गर्दीचा फायदा घेऊन त्याने जेव्हा माझ्या मांडीवर हात ठेवून तो उठला तेव्हा माझा संताप झाला. मग मी त्याला मारहाण करायला सुरुवात केली”, असं प्रिया लष्करे म्हणाल्या.
“मला जेव्हा लक्षात आलं की ही विकृती आहे त्यानंतर मी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. कारण ज्या पद्धतीने मला हात लावला ते मी सहन करु शकत नव्हती की त्याने मला कशापद्धतीने स्पर्श केला. ते मला खटकलं आणि म्हणून मी त्याला मारहाण करायला सुरुवात केली”, असं प्रिया लष्करे यांनी सांगितलं.
“ते माझ्यावर बितलं होतं म्हणून मी लढा दिला. बाकीच्या महिलांचं कसं, जोपर्यंत स्वत: सोबत असा अनुभव येत नाही तोपर्यंत कुणी मदतीला येत नाही हे मी ऐकलं होतं. पण त्यादिवशी मी ते अनुभवलं. ही अत्यंत चुकीची घटना आहे. सर्व महिला एकत्र आल्या तरंच आपण अत्याचार विरुद्ध लढू शकतो, असं मला वाटतं. पण ते नाही झालं. मी पोलीस ठाण्यात बस घेऊन गेली. पण इतर महिला या दुसऱ्या बसमध्ये बसायला गेल्या. म्हणजे माझ्या जवळ सुद्धा विचारायला आल्या नाहीत की, तू बरी आहेस का? काही महिला आणि मुली होत्या त्या सुद्धा मला विचारायला आल्या नाहीत”, अशी खंत प्रिया लष्करे यांनी व्यक्त केली.
“मी कंडक्टर आणि ड्रायव्हरला विनंती केली. त्यानंतर त्यांनीदेखील मला साथ दिली. पोलीस स्टेशनला गेल्यावर तिथे पोलीस नव्हते. मग त्यानंतर आम्ही दहा ते पंधरा मिनिटं पुण्यातील एका नगरसेवकांना फोन केला. या दरम्यान मी छेड काढणाऱ्याला पकडून धरलं होतं. त्याला मी तिथल्या एका खोलीत बंद केलं होतं आणि बाहेरुन कडी लावली होती. यानंतर मी पुण्यातील ओळखीच्या नगरसेवकांना फोन केला. अजय खेडेकर असं त्यांचं नाव आहे. पोलिसांची मला तातडीने मदत हवी आहे, अशी विनंती मी त्यांना केली. त्यानंतर त्यांनी लागलीच पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन करुन ती मदत मिळवून दिली”, असं प्रिया लष्करे यांनी सांगितलं.
“मी प्रियाचा पती आहे म्हणून असं म्हणत नाहीय, पण प्रत्येक स्त्रीने, माझ्या प्रत्येक बहिणीला असं कणखर बनलं पाहिजे. अशाप्रकारची घटना घडली तर तात्काळ अशी पावलं उचला”, असं आवाहन त्यांनी केलं.