मुंबई : मोहरमनिमित्त विविध ठिकाणी मुस्लिम बांधवांतर्फे वाझ/मजलीस तसेच मातम मिरवणुका आयोजित करण्यात येतात. कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता इतर कार्यक्रमांप्रमाणेच यावर्षी मोहरमच्या मिरवणुका काढण्यास परवानगी नसून मोहरम साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन गृह विभागाने केले आहे. (procession will not be allowed in Islamic festival Muharram due to Corona pandemic Maharashtra government issued new guidelines)
कोरोमनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मागील वर्षापासून विविध उपक्रम, कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, सण अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात आले. यावेळीसुद्धा मोहरम साध्या पद्धतीने करण्यासाठी गृह विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.
मोहरम महिन्यात (18 आणि 19 ऑगस्ट) ‘कत्ल की रात’ आणि ‘योम-ए-आशुरा’ निमित्ताने मातम मिरवणुका काढण्यात येतात. परंतु सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना सध्या बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणुका काढता येणार नसल्याच्या सूचना गृह विभागाने दिल्या आहे.
कोविड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे आपापल्या घरात राहूनच मोहरमचा दुखवटा पाळण्यात यावा. खासगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन घरीच करावेत. सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम/दुखवटा करु नये.
वाझ/मजलीसचा कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावेत. ताजिया/आलम काढू नयेत. सबील/छबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी कोरोना संदर्भात आरोग्याच्या दृष्टीकोनातून नियमांचे तंतोतंत पालन करावे. सबिलच्या ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करण्यात यावे. सदर ठिकाणी सामाजिक अंतर तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इ.) पाळण्याकडे लक्ष देण्यात यावे.
कोविड-19 या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक असल्याची माहिती गृह विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.
इतर बातम्या :
भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला, टीम इंडियाच्या क्रिकेटपटूवर मजुरी करण्याची वेळ
(procession will not be allowed in Islamic festival Muharram due to Corona pandemic Maharashtra government issued new guidelines)