जळगाव : 27 सप्टेंबर 2023 | राज्यात शिवसेना ( शिंदे गट), राष्ट्रवादी (अजितदादा गट) आणि भाजप महायुतीचे सरकार आहे. आगामी निवडणुक एकत्र लढण्याचे संकेत महायुतीकडून दिले जात आहेत. वरिष्ठ पातळीवर एकी असली तरी स्थानिक पातळीवर सर्वच काही आलबेल नाही अशा काही घटना अलीकडच्या काळात घडल्या आहेत. यात आणखी एका प्रकरणाची भर पडलीय. जळगावचे भाजप खासदार आणि राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे मंत्री एका प्रकल्पावरून आमनेसामने आलेत. अमळनेर तालुक्यातील पाडळसरे हा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. याच पाडळसरे निम्न तापी प्रकल्पावरून भाजप खासदार उन्मेष पाटील यांचा आंदोलनाचा इशारा दिलाय. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील मंत्री अनिल पाटील यांच्या मतदार संघातील हा प्रकल्प आहे.
अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील निम्न तापी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यावर आपला भर आहे. परंतु, प्रशासकीय अधिकारी या प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश होण्यासाठी सुधारित प्रस्ताव पाठवण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई करत आहेत, असा आरोप खासदार उन्मेष पाटील यांनी केलाय.
शेतकरी असतील किंवा नागरिक असतील अनेकदा पाडळसरे प्रकल्प अपूर्ण राहिल्याबद्दल लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्याकडे तक्रारी करतात. त्यांना काय उत्तर द्यायचं? असे म्हणत उमेश पाटील यांनी सरकारसह प्रशासनाला जाब विचारला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील मंत्री अनिल पाटील यांच्या मतदार संघातील हा पाडळसरे निम्न तापी प्रकल्प आहे. अनिल पाटील यांनी मंत्री झाल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण करण्याची ग्वाही दिली होती. मात्र, अद्यापही त्या कामाला सुरुवात झालेली नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.
येत्या महिनाभरात प्रकल्पाचा सुधारित प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला नाही तर आंदोलन करू असा इशारा खासदार उन्मेष पाटील यांचा दिलाय. या इशाऱ्याच्या निमित्ताने खासदार उन्मेष पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. तसेच, आह मंत्री अनिल पाटील यांना इशारा तर नाही ना असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झालाय.