नागपूरच्या दीक्षाभूमीजवळ अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध करत अनुयायी आक्रमक झाले. दीक्षाभूमी परिसरात सुरु असलेल्या बांधकामाची तोडफोडही केली. त्यानंतर फडणवीसांनी बांधकामाला स्थगिती दिली. दीक्षाभूमी समोरच होत असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध करत डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी आक्रमक झाले आणि बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी तोडफोड केली.
नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरात 3 मजली अंडरग्राऊंड पार्किंग होतेय. पार्किंगच्या कामासाठी खोदकाम सुरु आहे, त्यामुळं दीक्षाभूमीच्या स्तुपाला धोका निर्माण होईल अशी भीती अनुयायांना आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीनं मनमानी कारभार करत असल्याचा आरोप अनुयायांचा आहे.
स्मारक समितीनं तयार केलेल्या आराखड्यानुसार सरकारनं बांधकामासाठी पैसे दिले मात्र दीक्षाभूमी परिसरात कोणतंही बांधकाम नको म्हणत चलो दीक्षाभूमीचा नारा काही संघटनांनी दिला होता. अंडरग्राऊंड पार्किंगच्या नावाखाली कमर्शिअल कॉम्पलेक्सचा घाट घातला जात असल्याचा आरोप विरोधकांचा आहे.
अखेर फडणवीसांनी विधानसभेत, दीक्षाभूमी परिसरातील अंडरग्राऊंड पार्किंगच्या बांधकामाला स्थगिती देण्याची घोषणा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला विजयादशमीच्या दिवशी नागपुरात बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्याच ठिकाणी ऐतिहासिक दीक्षा भूमीची वास्तू आहे.
मात्र त्याच परिसरात अंडरग्राऊंड पार्किंग सुरु झाल्यानं अनुयायी आक्रमक झाले. फडणवीसांनी स्थगितीचे आदेश देताच स्मारक समितीनंही लिखीत दिल्यानं अनुयायी शांत झाले.