चंदन पूजाधिकारी, नाशिक | 11 डिसेंबर 2023 : नाशिक जिल्हा देशात शेतीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. जिल्ह्यातील शेतकरी घाम गाळून काळ्या आईची सेवा करतात. यामुळे देशाच्या नकाशावर नाशिकच्या शेतकऱ्यांची नोंद झाली आहे. कांद्याच्या संदर्भात केंद्राने निर्यात बंदीचा निर्णय घेतला. यामुळे आपणास रस्त्यावर उतरावे लागले. आजच्या आंदोलनामुळे दिल्ली सरकारची झोप उडाली असेल. परंतु रास्ता रोको केल्याशिवाय दिल्लीला कळत नाही. आता आंदोलनानंतर दिल्लीश्वरांना कांद्याची निर्यातबंदी उठवावीच लागणार आहे. ‘रास्ता रोको’तून केंद्र सरकारला आज संदेश दिला. आता उद्या दिल्लीत जाऊन संसदेत शेतकऱ्यांची व्यथा मांडणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. चांदवड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर संबोधित करताना शरद पवार यांनी केंद्र सरकारवर कठोर टीका केली.
शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळत नाही, हे दुर्देव आहे. मी कृषीमंत्री असताना कांद्याची किंमत कमी होणार नाही, हे स्पष्ट सांगितले होते. परंतु आताचे सरकार ते करु शकत नाही. यामुळे कांद्याची किंमत वाढताच निर्यात बंदी लागू केली आहे. कांद्याच्या निर्यातबंदीमुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहे. कांद्याची किंमत कमी होणार नाही, हे सरकारने स्पष्ट सांगण्याची गरज होती. जेवणात कांदा आवश्यक गोष्टी आहे. प्रत्येक मसाल्यात कांद्याचा वापर केला जातो. परंतु त्याचे दर वाढताच निर्यात बंदी केली जाते. सरकार शेतकऱ्यांचा काही विचार करणार आहे की नाही.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान अजून दिलेले नाही. हे अनुदान देण्याची प्रक्रिया लवकर राबवा. शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी द्या, अशी मागणी शरद पवार यांनी केली. तसेच नाशिककरांना शरद जोशी यांच्या आंदोलनाची आठवण करुन दिली. शरद जोशी यांनी नाशिक जिल्ह्यातून शेतकऱ्यांची सामूदायिक शक्ती उभी केली होती. त्यांनी शेतकऱ्यांची ताकद सरकारला दाखवली. तसाच इतिहास आता घडवायचा आहे. नाशिककरांना पुन्हा सामूदायिक शक्ती दाखवावी लागणार आहे.