लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवार प्रचारात व्यस्त आहे. बारामतीमधून त्यांना कुटुंबियांकडूनच आव्हान मिळाले आहे. यामुळे बारामतीच्या गड राखण्यासाठी त्यांना मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय प्रतिस्पर्धींच्या भेटीसुद्धा शरद पवार घेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. गेल्या 40 वर्षांपासून असलेला संघर्ष मिटवण्यासाठी त्यांनी थोपटे यांची भेट घेतली. भोर येथे शरद पवार यांची सभा होती. त्या सभेपूर्वी आमदार संग्राम थोपटे यांचे वडील आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या घरी ते पोहचले होते. आता 55 वर्ष प्रतिस्पर्धी असणाऱ्या काकडे कुटुंबियांकडे शरद पवार जात आहे. आता माजी खासदार कै. संभाजी काकडे यांची पत्नी कंठावती काकडे यांचे नुकतेच निधन झाले. यामुळे शरद पवार काकडे कुटुंबियांच्या सांत्वन भेटीसाठी जाणार आहेत.
शरद पवार यांचे प्रतिस्पर्धी म्हणून कै. संभाजीराव काकडे, कै. बाबालाल काकडे ओळखले जात होते. बारामती लोकसभा मतदारसंघातून संभाजीराव काकडे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची ओळख होती.1978 मध्ये भारतीय लोक दलातर्फे, तर 1982 मध्ये जनता दलातर्फे ते बारामतीतून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांच्या कुटुंबियांकडे आज शरद पवार 55 वर्षांनी जाणार आहेत. मुंबई फेडरेशनचे उपाध्यक्ष शामराव काकडे यांच्या निवासस्थानी शरद पवार भेट देणार आहेत. या भेटीत कंठावती काकडे यांच्या निधनामुळे काकडे कुटुंबियांचे सांत्वन शरद पवार करणार आहेत.
शरद पवार आणि काकडे कुटुंबियांचा संघर्ष कायम असताना अजित पवार यांनी त्यांच्याशी जमवून घेतले. शरद पवार यांची साथ सोडण्यापूर्वीच अजित पवार काकडे कुटुंबियांच्या जवळ गेले. मागील पाच वर्षांपासून ते काकडे कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. यामुळे अजित पवार यांनी शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांचे सुपुत्र अभिजीत काकडे यांना सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर संधी दिली आहे.
बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक यंदा पवार कुटुंबियांमध्येच होत आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात ही लढत होणार आहे. दोन्ही नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे.