अभिजित पोते, पुणे | 15 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. लोकसभेनंतर काही महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाचे अनेक दावेदार असणार आहेत. परंतु विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आणखी एका व्यक्तीचे नाव भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्यांनी पुढे आणले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले आहे. यामुळे राजकीय चर्चांना जोर आला आहे.
पुणे शहरातील पाट्या आणि बॅनर प्रसिद्ध आहेत. पुणेरी पाट्यांची चर्चा होते असते तसेच बॅनरची चर्चा होते. पुणे शहरात अनेक जणांसाठी भावी आमदार, भावी खासदार, भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले गेले आहेत. आता त्यात शिवसेना नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या नावाची भर पडली आहे. तानाजी सावंत यांना संघर्ष सेनेचे संतोष साठे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना तानाजी सावंत यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री केला आहे. त्यांनी पुणे शहरात लावलेले हे बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. पुण्यातील कात्रज चौकात हे बॅनर लावण्यात आले आहे.
पुण्यात भाजपने लोकसभेसाठी उमेदवार जाहीर केला आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ भाजपचे लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यांनी महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत गुरुवारी प्रचारास सुरुवात केली. ऐन लोकसभेच्या तोंडावर तानाजी सावंत यांचे लागलेले बॅनर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
पुणे शहरात यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. अजित पवार यांनी आपली महत्वकांक्षा मुलाखतीच्या माध्यमातून आणि जाहीर भाषणांमधून बोलून दाखवली आहे.